Pimpri : डाई-ईची कंपनीच्या स्थलांतरास कामगारांचा विरोध

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीचे व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या स्थलांतर सुरु केले आहे. याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून, शनिवार दि. 25 ऑगस्ट पासून कंपनी प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे.

डाई-ईची करकरिया ही कंपनी पुणे मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे 54 वर्षापूर्वी सुरु करण्यात आली. या कंपनीत उत्पादनाशी संबंधित शेकडो कामगार काम करीत आहेत. परंतू मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यासाठी सुरु केली आहे. त्यासाठी कंपनीतील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहेत. कामगारांना देशोधडीला लावणारा हा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटना, राज्य सरकार, उद्योग मंत्रालय, श्रम मंत्रालय यांना सर्वांना अंधारात ठेवून घेतला आहे. याच्या विरोधात हिंद कामगार संघटनेने माननीय न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. (सोबत न्यायालयाच्या आदेशाची पीडीएफ कॉपी जोडली आहे.). कंपनी व्यवस्थापनापूर्वी यापूर्वीच कोणतीही लेखी सूचना न देता कामगारांची बस आणि कॅन्टिन सुविधा बंद केली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्री अपरात्री कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करून कंपनी व्यवस्थापन मशिनरी हलविण्याचे काम करीत आहे. कामगारांची ही फसवणूक लक्षात आल्यामुळे कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

हिंद कामगार संघटनेची मागणी आहे की, कोर्टाच्या आदेशाची कंपनी व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी तसेच सर्व कामागरांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी. कायद्याप्रमाणे पूर्व प्रथेप्रमाणे फरकासह बोनस मिळावा. कंपनीने पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरु करून ज्या कामगारांना खोट्या आरोपांपोटी कामावरून काढून टाकले आहे त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे. 2008 सालापासून प्रलंबित असलेला कामगार वेतन करार कामगार संघटनेशी चर्चा करून केला पाहिजे. तसेच कामगारांच्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु करण्यात यावी व निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागेवर नव्याने कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात यावी. व त्यांना संघटनेचे सभासद होण्यासाठी हक्क मिळावेत. कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम कंपनी व्यवस्थापनाने ताबडतोब बंद करावे. तसेच आतापर्यंत या कपंनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे. या विषयाबाबतच हिंद कामगार संघटना न्यायालयात लढा लढतच आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व उत्पादन पूर्ववत सुरु करून कामगारांच्या न्याय हक्क मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कैलास कदम यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.