Pimpri News : राष्ट्रवादीच्या आमदाराचा विरोध, भाजपच्या आमदाराची शिफारस अन् महापालिकेकडून पाण्यासाठी सल्लागार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा विरोध डावलून आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांची शिफारस स्वीकारुन महापालिका प्रशासनाने अखेर पाणीपुरवठ्यासाठी सेवानिवृत्त सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांना सल्लागार म्हणून घेतले आहे. कोणतीही मुलाखत न घेता त्यांची 11 महिन्यांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासक राजेश पाटील यांनी आज (गुरुवारी) घेतलेल्या स्थायी, सर्वसाधारण सभेत मान्यता दिली.

पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत फेब्रुवारी महिन्यामध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त कारभार बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे दिला आहे. काही दिवसातच पाणीपुरवठा विभागासाठी लडकत यांना सल्लागार म्हणून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्याला राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी विरोध केला. तर, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी समर्थन केले. त्यामुळे लडकत यांची नियुक्ती होणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, सेक्टर क्रमांक 23 येथील स्काडा सिस्टीम, भामा आसखेड येथील धरणातून महापालिकेस पाणी उपलब्ध करुन घेण्याबाबतचा प्रकल्प, आंद्रा प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्रातील प्रकल्पाची कामे कार्यान्वित आईहेत. या प्रकल्पांच्या कामाचा अनुभव असलेल्या अभियंत्याची नेमणूक करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. त्यानुसार सेवानिवृत्त उपअभियंता, कार्यकारी अभियंता या पदावरील अधिका-यांची सल्लागार पदावर करार पद्धतीने दरमहा एकत्रित मानधनावर 11 महिने कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीसाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या एकमेव प्रवीण लडकत यांचा अर्ज प्राप्त झाला.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत अत्यावश्यक सेवेतील आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव लडकत धारण करत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडील कामकाजाची आवश्यकता विचारात घेता मौखिक मुलाखत न घेता सल्लागार पदावर लडकत यांना घेतले. त्याना शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येणार आहे. सुमारे 70 हजार रूपये मानधन दिले जाण्याची शक्यता असून अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लडकत यांना काम करावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.