Hinjawadi News : मागवला मोबाईल अन मिळाले फक्त चार्जर व केबल; ऍमेझॉन कंपनीकडून ग्राहकाला अजब उत्तर…

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने ऍमेझॉन कंपनीकडून ऑनलाईन माध्यमातून मोबाईल खरेदी केला. कंपनीने मोबाईलच्या नावाखाली पाठवलेले कुरियर ग्राहकाला मिळाले देखील. पण त्यात मोबाईल फोन आलाच नाही. मोबाईल फोनच्या बॉक्समध्ये केवळ चार्जर आणि केबल ग्राहकाला मिळाली. याबाबत ग्राहकाने कंपनीला संपर्क केला असता कंपनीने ग्राहकाला अजब उत्तर देऊन प्रकरण बंद केले. हा प्रकार हिंजवडी येथे 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत घडली.

विपुल विनोद पाटणी (वय 33, रा. फेज 1, हिंजवडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीत लिड डाटा साईंटीस्ट या पदावर काम करत आहेत. त्यांनी 14 सप्टेंबर रोजी रेडमी कंपनीचा 10 प्राईम, फन्टम ब्लक रंगाचा मोबाईल 14 हजार 499 रुपयाला ऑर्डर केला. मोबाईलची डिलिव्हरी पाटणी यांना 10 सप्टेंबर रोजी मिळाली. डिलिव्हरी मिळाल्यानंतर पाटणी यांनी मोबाईलचा बॉक्स न उघडता तसाच ठेवला.

काही वेळानंतर पाटणी यांच्या पत्नीने त्यांच्या घरात काम करणा-या महिलेसमोर मोबाईलचा बॉक्स उघडला. त्यामध्ये केवळ मोबाईल चार्जर व केबल तसेच इतर डॉक्युमेंट असल्याचे दिसले. बॉक्समध्ये मोबाईल आढळुन आला नाही. ती माहिती पत्नीने फिर्यादी यांना दिली. फिर्यादी यांनी याबाबत ऍमेझॉन कंपनीला संपर्क केला. कंपनीने या प्रकरणाचा तपास करून कळवतो, असे सांगितले. 27 सप्टेंबर रोजी ऍमेझॉन कंपनीकडून पाटणी यांना मेल आला. त्यात कंपनीने ‘पाटणी यांना त्यांच्या ऑर्डरची सुरक्षित डिलिव्हरी केली’ असल्याचे सांगितले. या उत्तराने पाटणी गडबडून गेले.

याप्रकरणी पाटणी यांनी थेट ऍमेझॉन कंपनी आणि डिलिव्हरी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.