Parth Ajit Pawar : पिंपरी-चिंचवड शहर विकासाचे पार्थ पर्व

पार्थ पर्व एक विकासाची गर्जना

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी लिहलेला विशेष लेख  “शहर विकासाचे पार्थ पर्व ” 

राज्यात नव्हे देशात सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड ओळखले जाते. उद्योगनगरी, कामगारनगरी, हरित, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी आणि आता मेट्रो सिटी म्हणून हे शहर नावारुपाला येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा कायापालट झाला. पिंपरी-चिंचवडला दादांनी हायटेक सिटी (स्मार्ट सिटी) बनविले. त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावरील जबरदस्त पकड विकासाची दिशा ठरवते. त्यांच्या योगदानामुळे देशाच्या नकाशावर शहराचे वेगळी ओळख, स्थान निर्माण झाले आहे.

शहर विकासाला चालना मिळाल्याने येथील प्रत्येक कुटुंबाचा विकास देखील  तेवढ्याच झपाट्याने होत गेला. हे सामान्यातला सामान्य नागरिक सुध्दा नाकारू शकत नाही. “अजितदादा म्हणजेच विकास आणि विकास म्हणजेच अजिदादा असे समीकरण” होऊन बसले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अजितदादांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांनी निवडणूक लढविली. त्यांनी कडवी झुंज दिली. अपयशाने ते खचून गेले नाहीत. पुन्हा नव्या जोशाने काम करत आहेत. संघटन वाढवत आहे. पार्थदादांना निवडून दिले असते. तर, शरद पवार साहेब आणि अजितदादांप्रमाणे शहराचा विकास झपाट्याने होत गेला असता. शहरवासीयांच्या एका चुकीमुळे पिंपरी-चिंचवड हे  विकासापासून दहा वर्ष मागे गेल्याची प्रचिती येत आहे.

1990 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होती. त्यावेळी पवारसाहेबांनी शिरुरमधील माझा जवळचा सहकारी कै. प्रमोद गायकवाड या टकारी समाजाच्या तरुणाला  निवडणूक लढण्याची संधी दिली. त्यांनी  पवार साहेब यांच्या नेतत्वाखाली पिंपरी-चिंचवड येथील शांतीनगर झोपडपट्टी (लांडेवाडी) याठिकाणी महाराष्ट्र  औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत अनाथ मुलांची आश्रम शाळा सुरू केली. कै. यशवंतराव चव्हाण आश्रम शाळा असे नामकरण करण्यात आले.

पवारसाहेबांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला या शाळेच्या संचालक मंडळात संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. भटक्या विमुक्‍त जाती समाजाचे नेते माजी, आमदार लक्ष्मण माने, नगरसेवक मुरचंद भाट, माजी महापौर कविचंद भाट आणि मला संचालक म्हणून काम करायला मिळाले. कै. प्रमोददादा गायकवाड यांना देखील साहेबांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून काम करता आले.  अजितदादांनी पहिल्यांदाच बँकेच्या संचालक मंडळावर  असताना  लोकसभेची निवडणूक लढविली. 1992 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे काम हाती घेतले. मी आमदार असताना दादांनी शहराच्या विकासात मला सहभागी करुन घेतले.

पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी वाट्टेल ते नावीन्यपूर्ण प्रकल्प आणण्याची माझी तयारी असून तुमची साथ हवी आहे, अशी अर्त हाक दादांनी दिली. त्यावेळी शहराचे नेतृत्व करणारे दृष्टये नेते आदरणीय प्रा. रामकृष्ण मोरे सर, शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा पाया रोवायला सुरुवात झाली.

अजितदादा आणि प्रशासनावर पकड हे समीकरण अनेकांना ठाऊक आहे. कडक स्वभाव, वक्तशीरपणा, कामाचा झपाटा यासारखे दादांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. कामाचा वेग आणि त्यातील अचूकतेकडे त्यांचे विशेष लक्ष असते. या दोन्ही बाबी असणारे नेते सध्या खूप कमी आहेत. त्यामध्ये अजितदादांचे नाव अग्रस्थानी आहे. विकासाच्या कामांमध्ये वैयक्तिक हितापेक्षा व्यापक समाजहित जपण्याला दादांनी नेहमीच प्राधान्य दिले.

विकासकामांना ते जास्त प्राधान्य देत असल्याने बेरजेच्या राजकारणाचा बादशहा अशीही त्यांची ओळख आहे. पक्षविरहित काम करण्याचा गुण हा दादांमधील प्रगल्भता दर्शवितो. राजकीय जीवनात केवळ आपणच यशाची शिखरे गाठण्याचा दादांचा स्वभाव नाही. आपल्यासमवेत खांद्याला खांदा लावून  काम करणारे कार्यकर्तेही मोठे झाले पाहिजेत, असा त्यांचा दृष्टीकोन असतो. त्यामुळे पक्षकार्यात सतरंज्या उचलणा-या कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या पदांवर विराजमान केले.

धडपडणा-या कार्यकर्त्यांवर दादांनी कधीही अन्याय केला नाही. त्यांना वेगवेगळ्या स्तरांवर संधी उपलब्ध करुन दिल्या. राजकीय जीवनात काम करणा-या जुन्या जाणत्यांकडून बाळकडू घेणा-या दादांनी कायमच सन्मानाची वागणूक दिली. त्याचबरोबर नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे काम दादांनी केले. जे योग्य आणि सत्य आहे. याची कास दादा कधीही सोडत नाहीत. मग त्याच्या परिणामांच्या विचाराला ते दुय्यम स्थान देतात.

यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. पुढे आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याला मूर्त स्वरुप दिले. त्यांनी अनेक कंपन्यांना शहरात आणले. त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे शहराची कामगार नगरीबरोबरच उद्योगनगरी अशी ओळख तयार झाली. पवारसाहेबांनी हिंजवडी आयटी हबची स्थापना केली.

जागतिक दर्जाच्या कंपन्यांना शहरात व्यावसाय प्रस्थापित करण्याची संधी दिली. त्यामुळे राज्याच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून नोकरी, व्यावसाय, उद्योग करण्यासाठी शहराकडे तरुणांचा कल वाढला. आज लाखो तरुणांना नोक-या उपलब्ध झाल्या आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे अपवादात्मक काही व्यवसाय ठप्प झाले असतील. परंतु, पवारसाहेबांच्या दृरदृष्टीमुळे शहराच्या विकासाला गती मिळाली.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेच्या सुविधा अपु-या पडू लागल्या. त्यावेळी अजितदादांनी लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात नागरी सुविधा भक्कम करण्यावर भर दिला. एवढेच नव्हे तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला देखील दादांनी न्याय दिला. अनेकांना महापौर केले. स्थायी समिती सभापती केले. वेगवेगळ्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पक्ष पातळीवर कामाची संधी दिली. दादांच्या कर्तृत्वाखाली शहराची आणि आमच्यासारख्या पदाधिका-यांची सुद्धा जडणघडण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना महापालिकेच्या माध्यमातून शहरात भक्ती-शक्ती शिल्प समुह उभारण्यात आले. अत्याधुनिक सायन्स पार्क, ऑटो क्लस्टरची निर्मिती केली. सुसज्ज असे बीआरटी रस्ते, 12 मीटर, 18 मीटर, 90 मीटर, 60 मीटर, 120 मीटरचे रस्ते विकसित करुन शहरावर वाढणारा वाहतूक कोंडीचा ताण 80 टक्क्याने कमी केला. पुलांचे जाळे उभारले.

शहराच्या वैभवात भर घालणारा नाशिक फाटा येथील भव्यदिव्य असा जेआरटी टाटा उड्डाणपूल उभा केला. भोसरीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिजामाता उड्डाणपूल बांधला, शिवसृष्टी, वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यासाठी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर संतशिल्प उभारण्याचे काम हाती घेतले.

दुर्गादेवी टेकडी उद्यान, अप्पूघर, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय विकसित केले. उद्याने विकसित केली.  शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे करोडो रुपयांचे एसटीपी प्रकल्प उभे केले. सामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षणाची कमतरता भासू नये म्हणून पालिकेच्या माध्यमातून 108 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा सुरु केल्या.

नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची स्थापना केली. आज या रुग्णालयात पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. नवीन जिजामाता, भोसरीतील नवीन रुग्णालय, थेरगावात रुग्णालय बांधले. कोरोना महामारीच्या काळात त्याचा मोठा उपयोग शहरवासीयांना झाला.

शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदीर, सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारण्यात आले आहे. या माध्यमातून शहरातील सांस्कृतीक क्षेत्राला जोपासण्याचे कार्य देखील दादांनी प्राधान्याने केले. देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समुह चौकात 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला. त्यावर डौलाने राष्ट्रध्वज फडकत आहे.

झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी जेएनएनयूआरएम हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला. त्यासाठी पवारसाहेबांनी केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी शहराला दिला. त्यामुळे आज हजारो रहिवाशांची निवासाची सोय झाली. हक्काचे घर मिळाले. मेट्रो प्रकल्पाला राष्ट्रवादीनेच मूर्त स्वरुप दिले. शहराचा कायापालट आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादांनी केला आहे.

साहेब, दादांच्या माध्यमातून शहराचा जो विकास झाला. तोच विकास पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. या तरुण तडफदार नेतृत्वाला काम करण्याची संधी देणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य होते.

विदेशात शिक्षण घेऊन मावळ मतदारसंघाच्या विकासाचे चित्र पालटून दाखविण्याची हिम्मत उराशी बाळगून पार्थ पवार लोकसभा निवडणुकीत उतरले होते. त्यांच्या पराभवामुळे शहर विकासात दहा वर्षे पाठीमागे गेल्याची प्रचिती येते. ज्या वेगाने शहराचा विकास पुढे झंजावत होता. तो आज रेंगाळला आहे. परंतु, अपयश आले. तरी, ते खचून गेले नाहीत.

राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील कित्येक प्रकल्प आज जैसे थे राहिले आहेत. महापालिकेतील भाजपच्या सत्तेला पाच वर्ष पूर्ण होत आली. तरी, त्यांना राष्ट्रवादीच्या काळातील विकास कामे पूर्ण करता आली नाहीत. भाजपने शहरवासीयांना उपयोगी पडेल असे एकही विकासकाम मागील चार वर्षांत केले नाही. शहराचा विकास फक्त  राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंब करु शकते.

विकास हीच पवार कुटुंबीयांची ओळख आहे. याची पारख करण्यात पिंपरी-चिंचवडकर कमी पडल्याची खंत वाटत आहे. परंतु, ही चूक आता पुढे घडणार नाही. याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. कारण, शहराचा विकास म्हणजेच तुमचा-आमचा विकास आहे. प्रत्येक नागरिकाचा विकास आहे. तो करण्याची धमक पवार कुटुंबीयांमध्येच आहे.

म्हणून पार्थ पवार यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाची पिंपरी-चिंचवडला आगामी काळात नितांत गरज आहे. हे उमदे नेतृत्व पुन्हा नव्याने विकासाचा झंजावात घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये येणार याची मला खात्री आहे. अशा झुंजार नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा…!

लेखक – विलास लांडे, माजी आमदार, भोसरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.