Pune : गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये ५० ढोल, १५ ताशे व ध्वज पथकाचा सहभाग

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र ची भूमिका ; एकूण १५० ते २०० वादक संख्या

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवात युवा शक्तीला चांगले वळण लावून विधायकतेकडे वळविण्याचा प्रयत्न ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र या ढोल ताशा पथकांच्या शिखर संस्थेने सातत्याने केला आहे. यंदा देखील तब्बल १७० पथकांतील सुमारे २२ हजार वादक गणेशोत्सवात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार असून गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये ५० ढोल, १५ ताशे व ध्वज पथकासह एकूण १५० ते २०० वादकांचा सहभाग राहणार आहे, अशी भूमिका ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.

Talegaon : भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनला पत्नीने स्वतःचे नाव लावले म्हणून पत्नीवर चाकुने वार

पत्रकार परिषदेला महासंघाचे विलास शिगवण, संजय सातपुते, प्रकाश राऊत, अ‍ॅड. शिरीष थिटे, अनुप साठ्ये, आशुतोष देशपांडे, उमेश आगाशे, ओंकार कलढोणकर आदी उपस्थित होते.

पुणे (Pune) शहरातील गणेशोत्सवात, गणेश अगमन व विसर्जन दिवशी सर्व ढोल ताशा व ध्वज पथके मिरवणुकांमध्ये सहभागी होणार आहेत. उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेली विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, यासाठी सर्व ढोल ताशा व ध्वज पथके प्रयत्न करतील आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य गणेश मंडळे व पोलिस प्रशासनाला करतील.

केवळ लक्ष्मी रस्ताच नाही, तर केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता टिळक रस्ता, कर्वे रस्ता अशा सर्वच प्रमुख विसर्जन मार्गांवरून ढोल ताशा पथक सहभागी होणार आहेत. सुरक्षा आणि शिस्त याकरिता पथकांच्या अग्रभागी बॅनर ठेवून प्रत्येक वादकाच्या गळ्यात पथकाचे ओळखपत्र असेल. कोणतेही पथक टोल वादन करणार नाही, त्याऐवजी झांजांचा समावेश करतील, याकडे लक्ष दिले जाईल.

तसेच, गणेश मंडळे व पोलीस प्रशासन यांच्याबरोबर महासंघ पदाधिकारी व स्वयंसेवक, विसर्जन मिरवणुकीत समन्वय राखण्यास प्रयत्नशील असतील. सर्व पथके समाधान चौक अथवा बाबू गेनू चौक येथून मिरवणुकीत सहभागी होतील व टिळक (अलका टॉकीज) चौक अथवा खंडुजीबाबा चौक पर्यंत मिरवणुकीत सहभागी राहतील.

ढोल ताशा महासंघातर्फे सामाजिक कार्य

महासंघातर्फे आयोजित रक्तदान शिबीरात एका दिवसात १ हजार ५०० पेक्षा अधिक युवक युवतींचे रक्तदान, कोविड काळात ३०० पेक्षा अधिक बँड वादकांना धान्य किटचे चे वाटप, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे पुणे शहरात स्वच्छता मोहीम सर्व पथकांनी राबविली व जिल्हाधिका-यांकडून तृतीय पारितोषिकाने सन्मान करण्यात आला.

प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉ शेखर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करीत ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलांच्या हाताला येणारी सूज ढोल वादनाने कमी होते, हे शास्त्रीयदृष्ट्या वादन करून सिद्ध झाले. स्वामी विवेकानंद यांचे सार्धशती निमिताने पुणे शहरातील सर्व पथकांतील वादकांनी व ध्वत्र एकत्रितपणे मानवंदना दिली. सुप्रसिद्ध वादक शिवमणी यांच्या उपस्थितीत झालेल्या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे.

सर्व पथके आपापल्या पातळीवर रक्तदान, वैद्यकीय शिबिरे, अग्निशमन शिबिर, व इतर सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत राहतात. तसेच वैकुंठ कर्मचारी, मनपा कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना मदतीसाठी सदैव तत्पर असून उपक्रम राबवितात. सर्व पथकांनी वेळोवेळी मोठी आर्थिक मदत सामाजिक कार्यात केली आहे.

पूर, भुकंप तसेच विविध नैसर्गिक आपत्ती सह अनेक अडचणींमध्ये गेल्या १० वर्षात साधारणपणे १० कोटी रुपयांच्या दरम्यान आर्थिक निधी उभा केला आहे. ढोल ताशा वादन कलेला खेळाचा दर्जा मिळावा, याकरिता स्व. खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना महासंघाने निवेदन देखील दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.