MPC News Explained : पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, तरी एकदिवसाआड पाणी का?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणात 98.58 टक्के म्हणजेच वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता तरी दररोज पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. परंतु, ती फोल ठरली. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही मागील दोन वर्षांपासून सुरु असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा आजही कायम आहे. पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, तरी एकदिवसाआड पाणी का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर, धरणात पाणी आहे. पण, पाणी आणणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे प्रशासन, सत्ताधा-यांकडून सांगितले जाते.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिली होती. जून, जुलैच्या मध्यापर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता.  त्यामुळे पाण्याचे संकट वाढण्याची चिन्हे होती. पण, 18 जुलैनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. धुंवाधार पाऊस पडत होता.  नदी नाले, ओढे तुडुंब भरुन वाहत होते. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील येवा वाढला.  1 जूनपासून धरण क्षेत्रात 2142 मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, 66.99टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

आजमितीला धरणात 98.58  टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर म्हणजेच सप्टेंबर 2022 पर्यंत पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली. धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली.  एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम आहे. पाणी कतापीपासून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत  नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. आता धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यानंतरही पाणी कपात कायम राहणार आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

…तर आज दिवसाआड पाणीपुरवठ्याची परिस्थिती  पहायला मिळाली नसती – महापौर

‘एमपीसी न्यूज’शी बोलताना महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ”पवना धरण भरले. धरणात पाणी पुष्कळ आहे. वाहून जात आहे. पण, पाणी उचलणारी, शुद्ध करणारी यंत्रणा नाही. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन आहे. ऑक्टोबर महिन्यापासून 100 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठ्यामध्ये सुरळितपणा येईल. सर्वांना समान पाणीपुरवठा होईल. पाणी उचलणारी यंत्रणा यापूर्वीच केली असती. तर, आज दिवसाआड पाणीपुरवठ्याची परिस्थिती  पहायला मिळाली नसती”.

धरण भरले पण पाणी आणण्याची यंत्रणा नाही – आयुक्त

महापालिका आयुक्त राजेश पाटील याबाबत म्हणाले, ”पवना धरणात पाणीसाठा मुबलक झाला. पण, पाणी आणण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प झाला नाही. नवीन यंत्रणा उपलब्ध केली जात आहे. नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा होईल”.

 पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा – तांबोळी

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, पवना धरणात 98.58 टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत पाण्याची काय अडचण नाही. हायड्रोतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आणखी महिनाभर पाऊस आहे. धरण परिसरात धोडा-धोडा पाऊस पडत आहे”.

पवना धरणाची आजची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस =59मि.मि.

# 1 जूनपासून झालेला पाऊस = 2142मि.मि.

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 1577

# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 98.58% टक्के

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 98.58% टक्के*

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ = 0.85% टक्के

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 66.99% टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.