PCMC : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानामध्ये महापालिकेच्या क्रिडा प्रबोधिनी विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या (PCMC) वतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रिडा प्रबोधिनी विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या अभियानाचा बक्षिस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, प्रधान सचिव रणजीत सिंह देवल यांच्या शुभहस्ते टाटा थिएटर नॅशनल सेंटर फोर परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी संपन्न झाला.महापालिकेच्या वतीने शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर-घोडेकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम वायळ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या (PCMC) शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी तसेच स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत राज्यातील अ आणि ब वर्ग महानगरपालिका गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे.

Maharashtra: तालुकास्तरावर हिमोफिलिया उपचार केंद्र उभारली जावीत, आमदार उमा खापरे यांची राज्य सरकारकडे मागणी

 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानातंर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांमधील तसेच व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम अशा विविध बाबींचा समावेश होता. या बाबींच्या आधारे शाळांनी केलेल्या या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मुल्यांकन करण्यात आले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाला अभियानामध्ये महाराष्ट्रातील 10 हजारांपेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदविला. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला आणि महापालिका शाळेस हे यश प्राप्त झाले, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.