PCMC : थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू होणार नाही

थकबाकीदारांना संपूर्ण कर भरावाच लागणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने (PCMC)मालमत्ता कराची चालू मागणी व थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहिम सुरू आहे. मात्र, थकबाकीदारांसाठी महापालिका अभय योजना लागू करणार आहे का, याबाबत नागरिकांकडून सातत्याने विचारणा होऊ लागली आहे.

 

महापालिकेची अभय योजना किंवा विलंब शास्ती माफीची योजना 1 एप्रिल 2022(PCMC) पासून कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना संपूर्ण कर भरावाच लागणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Akurdi: 85 हजारात आय फोन 15 प्रो देतो म्हणत मोबाईल शॉपी धारकाची फसवणूक, आरोपीला अटक

पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 22 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांडून महापालिका कर वसूल करते. यासाठी शहरातील विविध भागात कर संकलानासाठी 17 विभागीय कार्यालये आहेत. कर संकलन विभागाला 2023-24 या आर्थिक वर्षात 1 हजार कोटी रूपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. यासाठी कर संकलन विभागाने बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्ते करणे, वर्तमान पत्रात नावांची यादी छापणे, नळजोड खंडीत करणे, स्पीकरव्दारे थकबाकीदारांची नावे जाहीर करणे यासह विविध प्रकारे कर वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

थकबाकीदारांकडे महापालिकेचे पथक मालमत्ता जप्त किंवा कर वसुल करण्यासाठी गेल्यानंतर अनेक नागरिक हे अभय योजना कधी लागू होणार आहे किंवा मनपा कर शास्तीमध्ये (विलंब दंड महिना 2 टक्के प्रमाणे) माफी कधी मिळणार आहे, अशी विचारणा करत आहेत. वास्तविकता  महापालिकेची अभय योजना किंवा विलंब शास्ती माफीची योजना 1 एप्रिल 2022 पासून कायम स्वरुपी बंद करण्यात आली आहे.

 

त्यामुळे 1 एप्रिल 2022 पासून महापालिका मालमत्ता कर विलंब दंडासह वसूल करत आहे. यापुढील काळात कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही. त्यामुळे थकीत मालमत्ताधारकांनी त्वरीत आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.  दरम्यान, 1 लाख 4 हजार 326  मालमत्ता धारकांकडे तब्बल 682 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे थकीत कर वसूल करण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

830 कोटींचा टप्पा ओलांडला !
कर संकलन विभागाने महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात गतवर्षी 811 कोटींचा कर वसूल केला होता. मात्र, 2023-24 या आर्थिक वर्षात 13 मार्चअखेरपर्यंतचा तब्बल 830 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आर्थिक वर्षातील 18 दिवसांमध्ये जास्तीत-जास्त कर वसूल करण्यासाठी सहायक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम काम करत आहे.

1 हजार 634 मालमत्तांना जप्ती अधिपत्र डकविले

थकबाकी असलेल्या 1 हजार 634 मालमत्ता धारकांना तुमची मालमत्ता जप्त का करू नये, यासाठी अधिपत्र डकविले (चिकटविले) आहे. तर 584 मालमत्ता सील केल्या  आहेत.

शहर विकासासाठी नागरिकांनी चालू मागणी आणि थकीत मालमत्ता करू भरून महापालिकेला सहकार्य करावे. थकबाकीदारांसाठी कोणतीही अभय योजना लागू करण्यात येणार नाही. त्यामुळे थकबाकीवर दंडाची रक्कम वाढण्यापेक्षा तत्काळ कर भरावा.
शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक,
पिंपरी-चिंचवड महापालिका

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.