PCMC News : शहरातील 916 पैकी 30 मोबाइल टॉवर अनधिकृत; 65 कोटींची थकबाकी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकी असणाऱ्यांवर जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. शहरातील विविध भागात जप्तीची मोहीम राबवत असताना मोबाइल टॉवरधारकांकडे तब्बल 65 कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. शहरात 916 मोबाइल टॉवर अधिकृत असून 30 टॉवर अनधिकृत आहेत. अनधिकृत टॉवरधारकांनी महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 88 हजार मालमत्तांची नोंदणी आहे. या मालमत्तांना पालिकेच्या वतीने (PCMC News) कर आकारणी केली जाते. 2022-23 या आर्थित वर्षांत कर संकलन विभागाने 1 हजार कोटींचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. 600 कोटींची थकबाकी वसुल करण्यासाठी कर संकलन विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच 1 हजार कोटींचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाईही सुरू केली आहे. मात्र, शहरातील 916 मोबाईल टॉवर धारकांकडे 65 कोटी 48 लाख म्हणजे थकबाकीच्या 10 टक्के थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

Pune Cyber Crime : प्रसिद्ध सराफाचे नाव घेऊन स्टेट बँकेला लावला 19 लाखांचा चुना

शहरातील 916 मोबाइल टॉवर धारकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी कर संकलन विभागाने गतवर्षी टॉवर जप्त करण्याची मोहिम राबविली होती. त्यावेळी 35 ते 40 टॉवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या जप्तीच्या विरोधात टॉवर धारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मोबाइल टॉवर धारकांवर जप्तीसारखी कारवाई करू नये, असे आदेश पालिकेला दिले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने टॉवर धारकांकडून कर वसूल करण्यात अडचण येत आहे. मात्र, 2022-23 या आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत शास्ती करासह 22 कोटी 28 लाख रूपयांची वसुली झाल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशामुळे जप्तीसारखी कारवाई करण्यात येत नसल्याने पालिकेची (PCMC News) कोंडी झाली आहे.

भोसरीत सर्वाधिक 102 तर चऱ्होलीत 20 मोबाइल टॉवर

पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने वाढत आहे. त्यामुळे शहरातील मोबाइल टॉवरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सध्या 916 मोबाइल टॉवर आहेत. भोसरीत सर्वाधिक 102, सांगवीत 98, चिखलीत 77, निगडी-प्राधिकरण 74, आकुर्डीत 73, चिंचवडमध्ये 71 तर सर्वात कमी चऱ्होलीत फक्त 20 टॉवर आहेत. 916 टॉवर धारकांकडे 65 कोटी 48 लाखांची थकबाकी आहे.

शहरात 916 मोबाइल टॉवर अधिकृत असतानाच 30 टॉवर अनधिकृत आहेत. या अनधिकृत टॉवर धारकांनी पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडे (PCMC News) अधिकृत करण्यासाठी अर्ज केले आहेत. या टॉवर धारकांना 1 लाखांचा दंड आकारून अधिकृत करण्यात येत आहे. अधिकृत इमारतीवरच टॉवर उभारण्यासाठी परवानगी देण्यात येते, असे उपअभियंता राजेंद्र डुंबारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.