PCMC News : अधिकारी, कर्मचा-यांनो शिस्तीचे पालन करा, नागरिकांशी सौजन्याने वागा; अन्यथा कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी शिस्तीचे पालन करत नाहीत. अशा बेशिस्त अधिकारी व कर्मचा-यांवर कार्यवाही करण्याचे तपासणी अहवालाद्वारे कळविल्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही. अशा वर्तणुकीमुळे कार्यालयीन कामकाज विस्कळीत होत आहे. यामुळे अधिकारी, कर्मचा-यांनी नियमांचे पालन करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी सविस्तर परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची विभागप्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. (PCMC News) यापुढे तपासणी पथकाकडून तपासणी केल्यानंतर नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कार्यालयात येणा-या नागरीकांना सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, असे निर्देशही दिले आहेत.

कार्यालयांत नेमून दिलेल्या वेळेत काही अधिकारी, कर्मचारी नियमित उपस्थित रहात नाहीत. अशा अधिकारी,कर्मचा-यांच्या हजेरी पत्रकाची दैनंदिन तपासणी करून नियमाधीन कार्यवाही करावी. कार्यालयात प्रवेश करताना, कामकाज करताना ओळखपत्र न लावणा-यांवर कार्यवाही करावी. ज्या अधिकारी, कर्मचा-यांना कार्यालयीन कामकाजासाठी  फिरती करावी लागते, अशांनी फिरती रजिस्टरला नोंदी नोंदविणे, जादा कामकाजाच्या विहित नमुन्यातील रजिस्टर मधील नोंदी वेळोवेळी सक्षम अधिका-याने प्रमाणित करूनच भत्ते अदा करण्याची कार्यवाही करावी.

विभागप्रमुखांनी आपल्या नियंत्रणाखालील अधिकारी, कर्मचा-यांच्या थम्ब  इंम्प्रेशन, फेस रिडींग उपस्थितीच्या नोंदी वेळोवेळी तपासाव्यात.(PCMC News) विभागस्तरावर अशा नोंदी तपासून त्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल  दरमहा 15 तारखेपर्यंत प्रशासन विभागात सादर करावा. कार्यालयीन नोंद रजिस्टर अद्ययावत ठेवण्यात यावे. कार्यालयीन रजिस्टर अद्ययावत नसल्यास संबंधित अधिकारी, कर्मचा-यांवर कार्यवाही करावी.

महापालिकेच्या प्रशासकीय व आर्थिक कामकाज करित असताना कोणत्याही संवर्गातील वरिष्ठ पर्यवेक्षकिय  कर्मचा-यांनी कनिष्ठ कर्मचा-यांच्या कामकाजास मदत करावी. कर्मचा-याने सादर केलेल्या फाईलवर ‘अ’मान्य, ‘क्ष’मान्य एनढेच नमूद न करता स्पष्ट मत नोंदवावे. हाताखालील कर्मचा-याकडे प्राप्त झालेल्या सर्व टपालावर तातडीने निकाली काढण्यासाठी मार्गदर्शन करावे. कर्मचा-याने अभिलेखानुसार रेकॉर्ड ठेवले आहे किंवा नाही याची सुद्धा पहाणी करावी. अभिलेखानुसार रेकॉर्ड ठेवल्याची खात्री करावी.

Pune News : वारजेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दगडफेक

महापालिका कार्यालयात प्रवेश करताना नागरीकांना गेट पास देणे, कार्यालयात ये-जा रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी. सुरक्षा रक्षक नागरीकांना विचारणा न करताच कार्यालयात मुक्त प्रवेश देतात. हे महापालिका सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. यापुढे महापालिका ओळखपत्राशिवाय प्रवेश करणा-यास गेट पास, ये-जा रजिस्टरमध्ये नोंद घेवूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा. ओळखपत्राशिवाय प्रवेश देवू नये.

अधिकारी व कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहेत. त्याच विभागात थम्ब, फेस रिडींगद्वारे उपस्थिती नोंदविण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. तरी, देखील बरेच अधिकारी, कर्मचारी इतरत्र थम्ब, फेस रिडींग करत आहेत. अशांवर विभागप्रमुखांनी कारवाई करावी.(PCMC News) कार्यालयात येणा-या नागरीकांना सौजन्यपूर्ण वागणुक देण्यात यावे. तत्परतेने  कामकाज करण्यात यावे. कामकाजात  दिरंगाई, टाळाटाळ  करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर प्रशासकिय कार्यवाही करुन त्याची सेवा पुस्तकात नोंद घ्यावी.

नियत वयोमानाने महापालिका सेवेतून निवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचे निवृत्ती दिनांकापासून  किमान 8 महिनेपूर्वी निवृत्ती प्रकरण प्रस्तावित करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित आस्थापना लिपिकाने रितसर कार्यालयीन प्रस्ताव सादर करून पत्र व्यवहार करणे आवश्यक आहे. असे प्रकरणे मुदतीत सादर न केल्यास पर्यवेक्षकीय व नियंत्रित अधिका-याने विलंबाबाबतचे कारणे विचारावे, संबंधिताचा खुलासा घ्यावा.

सेवानिवृत्ती विलंबाचे प्रकरणांच्या तपासणीमध्ये  अधिकारी, कर्मचारी कार्यरत असताना त्यांचे सेवा नोंद पुस्तकामधील नोंदी, रजेचा हिशेब, वेतनवाढी, तीन लेट कार्यवाही, वेतननिश्चिती मधील त्रुटी तपासल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लेखा, मुख्य लेखापाल विभागाकडील आक्षेप निरस्त करण्यामध्ये सेवा निवृत्ती वेतन आदेश होण्यास विलंब होवू नये यासाठी तत्काळ कार्यवाही करावी.

ज्या अधिकारी, कर्मचा-यांचे कार्यरत विभाग सोडुन इतरत्र दुबार थम्ब इम्प्रेशन, बायोमेट्रिक फेस रिडींग होत आहे. असे थम्ब इम्प्रेशन, बायोमेट्रिक फेस रिडींग माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून तत्काळ रद करावे. सेवा निवृत्ती प्रकरणांमध्ये मुख्य लेखापाल व लेखा विभागाने संबंधित विभागाकडून (PCMC News) 8 महिन्यापूर्वी सादर केले असले. तरी, त्याची तपासणी करून तातडीने अहवाल द्यावा. प्रत्येकवेळी प्रकरण सादर केल्यानंतर नविन आक्षेप लावून प्रकरण वारंवार विभागाकडे पाठविण्यात येवू नये. ज्या प्रकरणी आक्षेप आढळून येणार आहे. त्या प्रकरणांचे संपूर्ण अवलोकन करुन एकाचवेळी आक्षेप काढण्यात यावे. आक्षेप कसे निरस्त करता येईल याबाबत उचित मार्गदर्शन करावे.

या परिपत्रकाचे विभागप्रमुखाने स्वत: अवलोकन करावे. नियंत्रणाखालील अधिकारी, कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून  अवगत केल्याची पोहोच द्यावी. वेळोवेळी हजेरी पत्रक तपासणे, फिरती, गणवेश व ओळखपत्र तपासणे हे शाखाप्रमुख, अहरण-वितरण अधिका-यांचे प्रथम कर्तव्य आहे. वारंवार अशा बाबींची तपासणी  पथकाने तपासणी करून निदर्शनास आणून देणे संयुक्तिक नाही. यापुढे  तपासणी पथकाकडून तपासणी केल्यानंतर या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर योग्य ती नियमाधिन कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.