PCMC : दीड लाख मालमत्ताधारकांकडे 450 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या कर आकारणी (PCMC) व कर संकलन विभागाने 600 कोटी रुपयांचा कर वसुलीचा टप्पा पार केला आहे. अद्याप 1 लाख 60 हजार निवासी मालमत्ताधारकांकडे 450 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. उर्वरित मालमत्ता धारकांनी मिळकत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 91 हजार मिळकतींची नोंद आहे. यंदाच्या 2022-23 या आर्थिक वर्षात कर आकारणी व कर संकलन विभागाने 1 हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 600 कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या विविध सवलत योजना आणि जप्तीच्या मोहीमेमुळे ही रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली आहे.

महापालिकेने जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सदनिका, व्यावसायिक गाळे जप्त केले जात आहेत. 526 मालमत्ता सील केल्या आहेत. याशिवाय, आतापर्यंत 8 हजार 863 जप्ती अधिपत्र तयार केली आहेत. तसेच 3 हजार 225 मालमत्तांवर जप्ती अधिपत्रानुसार कारवाई केली आहे. जप्ती कार्यवाहीनंतर 2 हजार 812 ८मालमत्तांचा कर वसूल झाला आहे. जप्ती कार्यवाहीतून वसूल झालेली कराची (PCMC) रक्कम ही तब्बल 43 कोटी 68 लाख 21 हजार 232 एवढी आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने रुपये 10 हजार, 25 हजार, 50 हजारपुढे मुळ कर व थकबाकी असलेल्या मालमत्तांना जप्ती पूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

Pune News : …तर आज बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले असते – प्रा. मिलिंद जोशी

कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक निलेश देशमुख म्हणाले, ”महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाही, त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत जप्तीची मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. दहा हजार रुपये आणि पंचवीस हजार रुपयांच्या पुढील मालमत्ता जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. सर्व जप्ती अधिपत्रांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोसायटी वगळता अन्य ज्या निवासी मालमत्तांकडे एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे, त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात येत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.