PCMC: कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदाची फेर मतमोजणी करा; औद्योगिक न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज – मागील दहा महिन्यांपूर्वी निवडणूक (PCMC) झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदासाठीच्या मतांची फेरमतमोजणी करण्याचा आदेश पुण्यातील औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. 31 डिसेंबरपूर्वी फेरमतमोजणी करावी. त्याचा सविस्तर अहवाल 3 जानेवारी 2023 पूर्वी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

याबाबतची माहिती अंबर चिंचवडे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी 25 फेब्रुवारी 2022 रोजी निवडणूक झाली होती. त्यात एकूण 5 हजार 505 कर्मचार्‍यांनी मतदान केले. अध्यक्षपदासाठी शंकर अण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे आणि आपला महासंघ पॅनलचे अंबर चिंचवडे यांच्यात चुरस झाली होती. या दोघांमध्ये केवळ 9 मतांचे अंतर होते.

मतमोजणी प्रक्रियेबाबत विविध आक्षेप घेत चिंचवडे यांनी तक्रार अर्ज केला होता. चिंचवडे यांचा अर्ज फेटाळत निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी अध्यक्षपदी झिंझुर्डे यांची निवड झाल्याचे घोषित केले. याविरोधात अंबर चिंचवडे यांनी कामगार आयुक्तांकडे दाद मागितली होती. सुनावणीनंतर कामगार आयुक्तांनी औद्योगिक न्यायालयात जाण्याची मुभा दिली. त्यानुसार चिंचवडे यांनी औद्योगिक न्यायालयात निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांच्याविरोधात दावा दाखल केला. औद्योगिक न्यायालयाचे सदस्य सुहास दभडगावकर यांच्या समोर या दाव्यावर सुनावणी झाली.

Pune News : गुरुवारी वारजे आणि चांदणी चौक परिसरातील पाणीपुरवठा बंद

चिंचवडे यांच्या वतीने अॅड. संतोष मस्के यांनी युक्तीवाद केला. चिंचवडे (PCMC) यांची बाजू ग्राह्य धरत दभडगावकर यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या मतांची फेरमतजोजणी करण्याचे आदेश दिले. 31 डिसेंबरपूर्वी फेरमतमोजणी करावी. मतमोजणी करण्यापूर्वी 24 तास अगोदर संघटनेचे पदाधिकारी, पोलीस, पालिका प्रशासनाला कळवावे. महापालिका मुख्यालयातच मतमोजणी करावी. फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिका-याला महासंघाने 20 हजार रुपये द्यावेत. फेरमतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिका-याकडे ‘रेकॉर्ड’ सोपवावे. फेरमतमोजणीचा सविस्तर अहवाल 3 जानेवारी 2023 पूर्वी न्यायालयात सादर करावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

अंबर चिंचवडे म्हणाले, ”माझ्यात आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतामध्ये केवळ 9 मतांचा फरक आहे. आकडेवारीत 294 मतांची बेरीज लागत नव्हती. फेरमतमोजणीत चित्र स्पष्ट होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.