Pune : महापालिका हद्दीलगतच्या गावात अंतर्गत मलवाहिनी विकसित करण्याचा स्थायीसमोर प्रस्ताव

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दी लगतच्या मांगडेवाडी, भिलारेवाडी या ग्रांमपंचातीच्या अंतर्गत मलवाहिनी विकसित करण्यासाठी महापालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. या कामासाठी ९ कोटी २६ लाख रुपये खर्च येणार असून याची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. 

कात्रज येथील मांगडेवाडी, भिलारेवाडी या गावातील दूषित पाण्यामुळे कात्रज तलावाचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेने गेल्या काही वर्षांत या परिसरात दहा ते बारा कोटी रुपये खर्च करून नानासाहेब पेशवे तलाव आणि उद्यानाचा विकास केला.  तलावाच्या आजूबाजूला असलेल्या झाडीमध्ये सुंदर असा ‘वॉकिंग ट्रॅक’ सुरू करण्यात आला. या सुविधेचा नागरिकांकडून दररोज लाभ घेण्यात येत आहे. जवळपास सतरा एकर परिसरात उद्यान आणि तलाव, याच परिसरात फुलराणी, आजी-आजोबा उद्यान असा २८ एकर परिसरात या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

हा परिसर पूर्वी महापालिका हद्दीत नसल्यामुळे येथे ड्रेनेजची सक्षम व्यवस्था नव्हती. त्यामुळे या भागातील सांडपाणी ओढ्यातून नानासाहेब पेशवे तलावामध्ये येत होेते. यामुळे तलावातील पाणी दुषित झाले असून जीवसृष्टी धोक्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी भिलारेवाडी व मांगडेवाडी भागात निर्माण होणारे सांडपाणी तलावाच्या बाहेरील बाजूने ड्रेनेजलाईन टाकून वाहून नेण्यासाठी सत्ताधारी भाजपने १० कोटी रुपयांचे वर्गीकरण केले होते. परंतू हद्दीबाहेर हे पैसे वापरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तसेच पक्षीय राजकारण झाल्याने काम होऊ शकले नाही. या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी तरतूद केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.