Pimple Gurav News: लेखनाला स्वानुभूतीची जोड हवी – प्रा. माधव राजगुरू

एमपीसी न्यूज – “लेखनाला स्वानुभूतीची जोड हवी; तरच ते काळाच्या कसोटीवर टिकून राहते!” असे विचार ‘बालभारती’चे निवृत्त विशेषाधिकारी प्रा. माधव राजगुरू यांनी पिंपळेगुरव (Pimple Gurav News) येथे मंगळवारी (दि.8) व्यक्त केले.

कवयित्री उषा वराडे लिखित ‘काव्यशलाका’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. माधव राजगुरू बोलत होते. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ (पिंपरी-चिंचवड) अध्यक्ष विजय जगताप अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, शिरीष पडवळ, सत्येंद्र वराडे आणि कवयित्री उषा वराडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्रीकांत चौगुले म्हणाले की, “कविता हा संवेदनशील मनाचा उत्स्फूर्त आविष्कार असतो. कवितेतून भावनिक उन्नयन घडते. समाजजीवनातील नकारात्मकता दूर करायची असेल तर सकारात्मक, संस्कारक्षम साहित्याची नितांत गरज आहे. त्यासाठी साहित्याच्या निर्मिती बरोबरच वाचन संस्काराच्या वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे!” शिरीष पडवळ यांनी आपल्या मनोगतातून कवयित्री उषा वराडे यांचा काव्यलेखनाची वाटचाल उलगडून सांगितली. शशिकांत धमाळ यांनी प्रास्ताविक केले.

Talegaon Dabhade : ‘स्वातंत्र्यसमर’ महानाट्यातून उलगडणार तब्बल 950 वर्षांचा इतिहास

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, शंकर आथरे, पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त (निवृत्त) श्रीकांत तरवडे, मधुसूदन दिवटे आणि शशिकला दिवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. माधव राजगुरू पुढे म्हणाले की, “साहित्यिकाने कोणत्याही दबावाखाली लिहू नये; तर आपले स्वतःचे अनुभव अन् वास्तव यांची (Pimple Gurav News) आपल्या अभिव्यक्तीतून मांडणी करावी.

‘काव्यशलाका’च्या माध्यमातून उषा वराडे यांनी विविध भावभावना व्यक्त करणाऱ्या कविता संग्रहित केल्या आहेत!” सागर पंधारे, बबन आल्हाट, प्रकाश शिंगटे, सागर थिगळे, सीमा पंधारे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय गायकवाड (जांभेकर) यांनी आभार मानले. प्रकाश घोरपडे यांनी सादर केलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.