Pimpri: आचार्य अत्रे रंगमंदिरावरील उधळपट्टीला स्थायीचा चाप; वाढीव खर्चाचा विषय 14 आठवडे तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरावर नुतनीकरणाची उर्वरीत कामे करण्याच्या नावाखाली सुमारे 45 लाखांच्या वाढीव खर्चाचा विषय स्थायी समितीने 14 आठवडे तहकूब ठेवला आहे.

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीचे विशेष सभा आज (सोमवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या वातानुकुलित यंत्रणेसह इतर दुरुस्ती आणि बदलांसाठी नोव्हेंबर 2017 पासून हे रंगमंदिर बंद ठेवण्यात आले होते. अत्रे सभागृहाच्या विद्युतीकरणाच्या कामाला वेळ लागल्याने नूतनीकरणाचे काम रखडले होते. नुकतेच आचार्य अत्रे रंगमंदिर खुले करण्यात आले.

महापालिकेने रंगमंदिरातील बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, फ्लोरिंग, साउंड सिस्टीम, रेस्टरूम, वातानुकुलित यंत्रणा, व्हीआयपी रूमचे सुशोभीकरण या कामांवर सुमारे 4 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, 99 टक्के काम पुर्ण झाले असून उर्वरीत 1 टक्के कामासाठी 45 लाखांच्या वाढीव खर्चाचा घाट घालण्यात आला होता.

देव कन्स्ट्रक्‍शन यांना रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या वास्तू विशारदाने काम सुरू असताना छताच्या कामात बदल सुचविले. परिणामी, अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या दरात तफावत निर्माण झाली. त्यामुळे नुतनीकरणाची उर्वरीत कामे अपूर्ण असून ती पुर्ण करण्यासाठी 45 लाख वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. मात्र, स्थायी समितीने हा विषय तहकूब ठेवला आहे.

अगोदर काम केले आहे. त्यानंतर विषय मान्यतेसाठी आणला होता. नवीन कामांच्या साहित्यात स्पर्धा झाली नाही. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव 14 आठवडे तहकूब ठेवल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.