BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: प्लास्टिक वापरणा-यांकडून 13 लाखाचा दंड वसूल

सहा महिन्यात साडेदहा किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त

131
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक एप्रिल ते 28 ऑक्टोबर 2018 दरम्यान प्लास्टिक वापरणा-या 263 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 13 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, दहा हजार 511 किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. तसेच प्लास्टिक व थर्माकॉल आढळल्यास संबंधिताविरुध्द नियमानुसार दंड व गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यावरणाचा -हास करणा-या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घातली आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.

त्यानंतर महापालिकेकडून प्लॉस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई केली जात आहे. एक एप्रिल ते 28 ऑक्टोबर 2018 दरम्यान सहा हजार 71 दुकाने, आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी प्लास्टिक वापरणा-या 263 दुकानदारांकडून 13 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, सुमारे दहा हजार 511 किलो प्लास्टिक व थर्माकॉल जप्त करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकामार्फत प्लास्टिक व थर्माकोल वापरणा-यांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिक, दुकानदार, व्यापारी यांना वारंवांर सूचना देऊन व दंडात्मक कारवाई करुनही अद्याप प्लास्टीक व थर्माकॉलचा वापर सुरु असल्याचे दिसून येते. ही बाब योग्य नसून नागरिकांनी प्लास्टिक, थर्माकॉलचा वापर टाळावा. प्लास्टिक व थर्माकोल वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास पाच हजार रुपये, दुस-यांदा आढळल्यास दहा हजार आणि तिस-यांदा प्लास्टिक आढळल्यास 25 हजार रुपये व तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तपासणीमध्ये प्लास्टिक व थर्माकॉल आढळल्यास संबंधिताविरुध्द नियमानुसार दंड व गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.