Pimpri : शाळेच्या 100 मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – शैक्षणिक संस्थांजवळ तंबाखूजन्य (Pimpri) पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून 72 ठिकाणी शाळेच्या 100 मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली आहे.

शहरातील विविध भागातील 72 ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसराची पाहणी महापालिका आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने केली. टपरी, चहाविक्रीची ठिकाणे, पत्राशेड, खाजगी जागा, बंदिस्त गाळे, भाजी विक्री केंद्र, आदींची तपासणी यावेळी करण्यात आली.

संशयास्पद वाटलेल्या विक्रेत्यांना नोटीस बजावून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. तसेच शाळांच्या 100 मीटर परिसरात बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्यादेखील हटवण्यात आल्या.

तरूण पिढीसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावे तसेच ते कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष कायदे तयार केले आहेत. तंबाखूच्या धोक्यापासून (Pimpri) विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याकरिता राज्य सरकारने शाळेच्या शंभर मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे.

त्याचबरोबर शालेय परिसर तंबाखूमुक्त राहण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यासाठी निर्देशदेखील दिले आहेत. केंद्र शासनाच्या सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा, 2003 च्या तरतुदींनुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखू उत्पादनांची विक्री करण्यास सक्त मनाई आहे.

या नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूददेखील या कायद्यात करण्यात आली आहे. त्या आधारे महापालिका आणि पोलीस दलाने शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या संयुक्त पथकाद्वारे शहरातील विविध शैक्षणिक संस्थाच्या परिसराची वारंवार पाहणी केली जात असून 100 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

ब क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चार आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 8 विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच 4 विक्रेत्यांच्या टपऱ्या देखील हटवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची कारवाई इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये देखील सुरू आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, “अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथक आणि महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील शैक्षणिक संस्थांच्या परिसराची संयुक्त पाहणी केली. तंबाखूजन्य पदार्थ विक्री होणाऱी 72 ठिकाणे यात आढळून आली.

Pune : एलपीएफ तर्फे 263 मुलींना शिष्यवृत्ती

सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 325 गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील विविध संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने महापालिका पाऊले उचलत आहे. शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूजन्य अंमली पदार्थांपासून मुक्त रहावा यासाठी महापालिका आणि पोलीस दल काम करत आहे.

तरूण पिढीचे भविष्य उज्ज्वल आणि आरोग्यदायी व्हावे हा यामागचा प्रमुख उद्देश असून त्यांच्या संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी करून शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, महापालिका आणि पोलीस दलाच्या माध्यमातून शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे. नागरिकांनी या मोहीमेत सहभाग घेऊन शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास महापालिकेच्या शिक्षण विभागास तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबतची माहिती द्यावी. अशा नागरी सहभागामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास निश्चितपणे हातभार लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.