pimpri: नाट्यमय घडामोडीनंतर क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यावरुन सत्ताधारी भाजपमध्ये धुसफूस पहायला मिळाली. उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आग्रही होते. मात्र, शिंदे महापालिकेत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या शहराध्यक्षांनी पदाधिका-यांना खडेबोल सुनावत क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यास सांगितले.  त्यामुळे नाट्यमय घडामोडीनंतर हिंगे यांना एकाचवेळी दोन्ही पदाची लॉटरी लागली आहे. दरम्यान, सायंकाळी साडेपाचनंतर शीतल शिंदे महापालिका वर्तुळात वावराताना दिसले.  

महापौर, उपमहापौरपदासाठी आज दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. बंडखोरी होण्याची भिती असलेल्या भाजपने  शेवटच्याक्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व पदाधिकारी नगरसचिव कार्यालयात बसले होते. परंतु, उमेदवार मात्र आले नव्हते.

पाच वाजण्यास दहा मिनिटे कमी असताना महापौरपदासाठी माई ढोरे यांचा अर्ज भरला. उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांचा अर्ज भरण्यात येणार होता. त्यासाठी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आग्रही होते. त्यामुळे जगताप यांनी शिंदे यांना बोलविण्याची सूचना केली. परंतु, शिंदे महापालिकेत नसल्याचे महापालिकेतील पदाधिका-यांकडून शहराध्यक्षांना सांगण्यात आले.

त्यामुळे शहराध्यक्ष संतापले आणि महापालिकेतील पदाधिका-यांना खडेबोल सुनावले. दालन सोडून जाण्यासाठी उठून उभा राहिले. चिडलेल्या शहराध्यक्षांनी तत्काळ तुषार हिंगे यांना बोलविले आणि त्यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे हिंगे यांना एकाचेवळी दोन्ही पदांची लॉटरी लागली आहे. दरम्यान, साडेपाचनंतर शीतल शिंदे हे महापालिका वर्तुळात वावरताना दिसले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.