Pimpri : सिंथेटिक ट्रॅकचे काम लांबल्याने विद्यार्थी व खेळाडूंचे वार्षिक नुकसान; श्रीमंत महापालिकेचा एकच सिंथेटिक ट्रॅक

विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणीनगर, भोसरी येथील (Pimpri) संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात असलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे नुतनीकरणाचे काम मागील 10 महिन्यांपासून लांबले आहे. विविध ऍथलेटिक्स व मैदानी स्पर्धांसाठी आवश्यक असणारा सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व खेळाडूंचे 2023-24 या शैक्षणिक वर्षात मोठे नुकसान झाले असून त्यामुळे त्यांना विविध स्पर्धांना मुकावे लागले आहे. देशातील श्रीमंत अशा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे एकच सिंथेटिक ट्रॅक असून तेही दुरुस्तीसाठी मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी, पालक व खेळाडूंकडून त्याबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

शहरातील विद्यार्थी, ऍथलेटिक्स खेळाडू, व नागरिक हे शालेय स्पर्धा, महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, पोलीस भरती व तत्सम सेवांसाठी लागणाऱ्या मैदानी चाचणी व व्यक्तिगत सरावासाठी मोठ्या संख्येने इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील ट्रॅकचा वापर करतात. त्यासाठी शहरातील सर्व भागासह महापालिका क्षेत्रालगत असलेल्या लष्करी छावणी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्यने या मैदानावर येतात.

अवघ्या 4 महिन्यात मैदान दुरुस्त करून ते पुन्हा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन खेळाडू व पालकांना देऊन मार्च 2023 पासून हे मैदान दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे. त्यानंतर 10 महिने होत आले अद्यापही मैदानाची दुरुस्ती पूर्ण झाली नाही. मैदानाचे काम संथ गतीने सुरु असल्याने महापालिका आणि संबंधित ठेकेदारांच्या कारभाराबाबत विद्यार्थी, खेळाडू, पालक यांनी असंतोष व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक नुकसानाला महापालिका जबाबदार असल्याचे मत खेळाडू व विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले. तसेच हे मैदान बंद असल्याने (Pimpri) पुण्यातील सणस ग्राउंड किंवा बालेवाडी स्टेडीयम असा लांबचा व खर्चिक पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक राहिला असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी खेळापासून  संन्यास घेतला आहे.

Pune : दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

जिल्हास्तरीय, विभागीय, राज्य, आणि राष्ट्रीय पातळीवर कारकीर्द घडविण्यासाठी एक वर्षाचा कालावधी हा फार महत्वाचा काळ असतो. एक वर्ष वाया गेल्याने पालकांनी हळहळ व्यक्त केली. सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून या क्रीडा संकुलाचे नुतनीकरणाचे काम चालू आहे.

याबाबत क्रीडा विभागाचे उप आयुक्त मिनिनाथ दंडवते यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाच्या नुतानीकरणासाठी मैदानाचा ताबा महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे देण्यात आला आहे. मैदानाचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच मैदान आमच्याकडे सुपूर्द केले जाईल. त्यासाठी स्थापत्य विभागाशी पत्रव्यवहार सुरु आहे.

स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पावसामुळे मध्यंतरी काम संथ गतीने होत होते. ट्रॅकसाठी लागणारे मटेरियल परदेशातून मागवावे लागते, त्यामुळे उशीर होत आहे. येत्या 15 जानेवारी पर्यंत मैदानाचे काम पूर्ण होऊन ते मैदान खुले केले जाईल, असे ते म्हणाले.

इंद्रायणीनगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात दररोज सुमारे 1 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी, खेळाडू, नागरिक सरावासाठी येतात. तसेच 5 ते 6 प्रशिक्षण संस्था या संकुलात खेळाडूंना प्रशिक्षण देतात. सुमारे 25 पेक्षा अधिक खेळांची तयारी व सराव या मैदानावर खेळाडू करत असतात. या मैदानावरील ट्रॅक ची लांबी 400 मीटर आहे तर रुंदी 10.5 मीटर आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव ईपीडीएम पीयुस्प्रे ट्रॅक असून ते बंद असल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय झाली आहे. नव्या वर्षात पहिल्या महिन्यात तरी हे मैदान सुरु होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.