Pimpri : विधानसभा निवडणूक प्रचारात जादा दराच्या ‘टोप्या घालणे’ उमेदवाराला महागात पडणार

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीचा सर्व खर्च उमेदवारांना द्यावा लागत आहे. त्यासाठी अगदी प्रचारकांच्या जेवणावळीपासून ते मिरवणुकीतील ढोल-ताशा पर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिला आहे. इतकेच नव्हे, तर मफलर, टोप्या अन् गमछा यांच्यासाठी देखील निवडणूक विभागाने ठरविलेल्या दरानुसार रक्कम मोजावी लागणार आहे. त्यापेक्षा जादा दराच्या ‘टोप्या घालणे’ उमेदवाराला महागात पडणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. मात्र, उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाने चांगलाच ‘वॉच’ ठेवला आहे. त्यातही प्रचारक कार्यकर्त्यांचा पवित्रा आता निवडणूक आयोगालाही ठाऊक झाल्याने आयोगाने त्यांच्या ‘पोटापाण्याची’ तरतूद करताना त्याचे दर देखील ठरविले आहेत. निवडणूक आयोगातर्फे खर्चासह ही तरतूद करून कार्यकर्त्यांच्या तंदुरुस्तीची काळजी वाहिली आहे. इतकेच नव्हे, तर प्रचारादरम्यान डोक्यावर घालाव्या लागणा-या टोप्या, गळ्यातील मफलर यांचे दर देखील आयोगाने ठरविले आहेत.

प्रचारसभेसाठी जेव्हा उमेदवार येतात, तेव्हा त्यांना गमछा, मफलर घातले जातात. पक्षप्रवेशाच्या वेळी देखील तेच परिधान केले जाते. त्याचे दर तीन ते साडेआठ रुपये प्रतिनग असणार आहेत. व्यासपीठावरील उमेदवार, स्टार प्रचारक यांची टोपी साडेतीन ते नऊ रुपये या किंमतीची असेल, तरच ती नियमानुसार आहे. त्यापेक्षा जास्त रकमेच्या टोप्या परिधान करणे, हा ‘टोपी घालण्याचा’ प्रयत्न ठरू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.