Pimpri : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचारी, सुरक्षा रक्षकावर हल्ला

एमपीसी न्यूज – एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर आणि सुरक्षा रक्षकावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कोयत्याने वार करून पैशांची रिकामी बॅग हिसकावून पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि.23) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीतील कामगारनगर येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रासमोर घडली.

समाधान श्रीधर वाघमारे (वय 22, रा. फुरसुंगी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे हे ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करतात. कंपनीतर्फे विविध बँकांच्या एटीएम केंद्रात पैसे भरण्याचे काम केले जाते. सोमवारी दुपारी वाघमारे हे कामगारनगर येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे भरण्यासाठी आले. एटीएममध्ये पैसे भरून बाहेर आले. त्यावेळी पाठीमागून मोपेडवरून हेल्मेट घातलेले दोन चोरटे आले. चोरट्यांनी फिर्यादी वाघमारे व गनमॅन संतोष पांडे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला.

वाघमारे यांनी नुकतेच एटीएममध्ये पैसे भरले असल्याने चोरट्यांच्या हाती रिकामी बॅग लागली. यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. यामध्ये दोन्ही कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.