Pimpri : अंगणवाडी सेविका मदतनिसांचा प्रश्न सोडवण्याचे भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे आश्वासन

अंगणवाडी सेविकांचा भाजप कार्यालयावरील मोर्चा पोलिसांनी अडवला

एमपीसी न्यूज – आपल्या विविध मागण्यांसाठी (Pimpri ) अंगणवाडी सेविका सत्ताधारी पक्षाच्या खासदार आमदारांच्या कार्यालयावर मोर्चे निदर्शने आदी मार्गाने आंदोलन करत आहेत. पिंपरीमध्येही शहर भाजप कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवारी (दि. 11) मोर्चा काढण्यात आला. मात्र हा मोर्चा पोलिसांनी मोरवाडी रस्त्यावर मध्येच अडवला. दरम्यान पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्ष महिला अध्यक्ष सुजाता पलांडे, माजी नगरसेविका वैशाली खाडे आदी पदाधिकारी या मोर्चाला सामोरे जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. त्यांना मानधन ऐवजी वेतन लागू करावे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मानधनात भरीव वाढ करावी आदी मागण्यासाठी चार डिसेंबर पासून राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यांचे बंद आंदोलन सुरू झाले आहे.

यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष नितीन पवार म्हणाले, सन 1975 साली अंगणवाडीची म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सुरुवात झाली. या योजनेमार्फत गरीब वस्त्या गाव-पाड्यातील बालकांना पूरक पोषक आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर महिलांना आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण इत्यादी महत्त्वाचे काम केले जाते. ते करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या देशाच्या मानवी विकासदूत म्हणूनच काम करतात. मात्र त्यांना अतिशय कमी मानधनावर काम करावे लागते.

याबाबत सातत्याने आंदोलन करूनही अंगणवाडी सेविकांना पुरेसे मानधन मिळत नाही. आता आपल्या हक्कांसाठी अंगणवाडी सेविकांनी निकराची लढाई करायचे ठरवले आहे आज आम्ही सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर थांबलो आहोत. पण प्रश्न सुटले नाही तर लोकशाही मार्गाने कार्यालयात येऊन ठिय्या देऊ, असा इशाराही नितीन पवार यांनी दिला.

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व इतर संस्थाच्या वतीने 122 मूकबधिर मुले व ज्येष्ठांना श्रवण यंत्र वाटप

दरम्यान गुजरात येथील अंगणवाडी सेविकेने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना अंगणवाडी सेविका या मानसेवी नसून कर्मचारी आहेत. त्यांना मिळणारे मानधन हे वेतनच आहे. त्या प्रॉव्हिडन्ट फंड, ग्रॅच्युटी इत्यादी सर्व सामाजिक सुरक्षा मिळण्यासाठी पात्र आहेत. असा महत्त्वपूर्ण निकाल मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाची अंमलबजावणी करावी आणि तातडीने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वेतन लागू करावे, या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.

या मागण्या घेऊन सोमवारी पिंपरी चिंचवड महापालिका शेजारील (Pimpri) आदर्श राज्यकर्ती अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली. मानधन नको दयेचे – वेतन हवे हक्काचे, भाऊबीज नको दयेची – बोनस हवा हक्काचा, आम्हाला टेन्शन – तुम्हाला पेन्शन, आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे आदी घोषणा देत मोर्चा भाजप कार्यालयाकडे निघाला.

त्याआधी पिंपरी पोलिसांनी अशाप्रकारे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढता येणार नाही अशी नोटीस संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बजावली होती. मात्र राजकीय पक्ष हे लोकांशी संबंधित असून कुणाच्या व्यक्तिगत घरांवर आम्ही मोर्चा काढत नाही. सत्ताधारी राजकीय पक्षच शासनात धोरण ठरवत असतात. भारतीय जनता पक्ष हा केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे. भारतीय जनता पक्षाच्याच स्मृती इराणी या महिला बालविकास मंत्री आहेत. म्हणून या पक्षाच्या स्थानिक कार्यालयावर आम्ही मोर्चा काढत आहोत अशी भूमिका घेऊन संघटनेने मोर्चाला सुरुवात केली.

मात्र मोरवाडी रस्त्यात मध्येच पोलिसांनी मोर्चा थांबवला. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष पलांडे, खाडे आदी पदाधिकारी मोर्चाला सामोऱ्या आल्या. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अंगणवाडी सेविका या अतिशय मूलभूत आणि प्रामाणिक काम करत असून त्यांच्या प्रश्नाची आम्हाला जाण आहे. विधान परिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार उमा खापरे यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केले आहेत.

त्यांचे प्रश्न सुटावेत आणि हा बंद लवकर मिटावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. हिवाळी अधिवेशनात पक्षाच्या आमदारांकडे या प्रश्नावर आम्ही दाद मागू असे आश्वासन या पदाधिकाऱ्यांनी दिले. मोर्चात शेकडोच्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या. शैलजा चौधरी, सुनंदा साळवे, शकुंतला घोरपडे, उर्वशी गाढवे, अनिता आवळे या अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांसह रिक्षा पंचायतीचे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अशोक मिरगे, काशिनाथ शेलार, कष्टकरी महासंघाचे नेते काशिनाथ नखाते यांनीही मोर्चा सहभागी होऊन पाठिंबा दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनीही मोर्चात सहभागी होऊन लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांचे दीर्घ प्रलंबित प्रश्न सोडवावे असे आवाहन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.