Chinchwad News : सहा जिल्ह्यातील 444 परीक्षा केंद्रांवर होणार पिंपरी – चिंचवड पोलीस भरती परीक्षा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी 19 नोव्हेंबरला पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांत लेखी परीक्षा होणार आहे. सहा जिल्ह्यांतील 444 परीक्षा केंद्रांवर एक लाख 90 हजार 319 उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या 720 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असणार आहे. अर्ज केलेल्यांपैकी पात्र ठरलेले एक लाख 90 हजार 319 उमेदवार ही लेखी परीक्षा देणार आहेत. परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे.

पिंपरी – चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा शुक्रवारी (दि. 19) नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे. परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक आहे. याआधी पुणे पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत डमी उमेदवार परीक्षेला बसवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे कॉपी तसेच डमी परीक्षार्थी असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व इतर तीन पोलीस अशा चार जणांचे हे पथक असेल. परीक्षा सुरू असताना हे पथक पाहणी करणार आहे. परीक्षेसाठी 11 हजार पोलिसांचा बंदोबस तैनात करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात 217 केंद्रांवर एक लाख 856 परीक्षार्थी, अहमदनगर जिल्ह्यात 47 केंद्रांवर 17 हजार 68 परीक्षार्थी, सोलापूर जिल्ह्यात 25 केंद्रांवर 11 हजार 878 परीक्षार्थी, औरंगाबाद जिल्ह्यात 77 केंद्रांवर 21 हजार 723 परीक्षार्थी, नाशिक जिल्ह्यात 31 केंद्रांवर 13 हजार 800 परीक्षार्थी, नागपूर जिल्ह्यात 47 केंद्रांवर 24 हजार 994 परीक्षार्थी परीक्षा देतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.