Pimpri: लॉकडाऊनमुळे बेरोजगारांसाठी ‘मी भूमिपुत्र, माझा रोजगार’ ऑनलाईन नोकरी महोत्सव

pimpri-chinchwad: shiv sena's online job festival for the unemployed due to lockdown संकटात अनेकदा संधी चालून येते. औद्योगिक कंपन्यानाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज- राज्यातील परप्रांतीय लाखो कामगार, मजुरांनी कोरोनाचे संकट आल्याने राज्यातील अनेक शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून आपला संसार गुंडाळून आपलं गाव गाठलंय. मन्युष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होत आहे.

उद्योगांसमोर कोरोनामुळे उभी राहिलेली ही अडचण राज्यासह पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी घेऊन आली आहे. भूमिपुत्रांना या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इच्छुकांसाठी ‘मी भूमिपुत्र, माझा रोजगार’ या ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. त्याद्वारे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणीक अहर्तेद्वारे नामांकित कंपनीत रोजगार मिळणार आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात असंघटित क्षेत्रातील रोजगारावर गदा आली. त्यानंतर लॉकडाऊन वाढवत नेल्याने संघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार कपात होऊ लागली.

अनेक स्टार्टअपने ले-ऑफची घोषणा केली. मध्यम व मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांनीही आपल्या कर्मचा-यांना नोकर कपात केल्याची घोषणा केली. असंघटित क्षेत्रातील लाखो श्रमिकांना लॉकडाऊनमुळे तडाखा बसला आहे.

याबाबत माहिती देताना इरफान सय्यद म्हणाले की, कोरोना विषाणू संक्रमणामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्यभरातील असंघटित क्षेत्रातील अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या गावी गेले आहेत.

मोठ्या प्रमाणावर लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या गावी गेले आहेत किंवा अनेक शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या स्थलांतरितांना लगेच काम मिळणे कठीण आहे.

आता लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य सरकारने उद्योगांना सवलती दिल्याने राज्यासकट पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील उद्योगधंदे सुरु झाले आहेत. मात्र, कामगारांअभावी उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास अडचणी येत आहेत.

संकटात अनेकदा संधी चालून येते. औद्योगिक कंपन्यानाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या आणि प्रत्येकाच्या हाताला काम देण्याच्या हेतूने भूमिपुत्रांना या नोकऱ्यांचा लाभ घेता यावा यासाठी ‘मी भूमिपुत्र, माझा रोजगार’ या ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे’ आयोजन केले आहे.

त्यासाठी इथल्या मराठी तरुणांनी एक पाऊल पुढे येत या नोकऱ्यांमध्ये संधी मिळवण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी व नामांकित कंपनीत रोजगार प्राप्त करावा, असे आवाहन शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी भूमिपुत्रांना केले आहे.

रोजगारासाठी इच्छुक युवक-युवतींनी http://forms.gle/Rp5fNomb7JNtfE127 email:[email protected] या गुगल ड्राईव्हवर जाऊन लिंक क्लिक करून आपली माहिती व बायो-डाटा अपलोड करून नावनोंदणी करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.