Pimpri: दिलासादायक!; पिंपरी-चिंचवड शहरातील 94 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे अनेक संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह देखील येत आहेत. शहरातील 94 संशयितांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे. आज (शुक्रवार) सकाळी 11 ते सायंकाळी साडेसहा या वेळेत एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळला नाही. तर, सकाळी 11 च्या अगोदरच्या रिपोर्टमध्ये 12 रुग्ण पॉझिटीव्ह आले होते.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील 81 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका रुग्णालयात 49 कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेरील पण पिंपरी महापालिका रुग्णालयात एक आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल आहेत. तर, आजपर्यंत शहरातील तीन जण आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये अशा चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 107
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 00
    #निगेटीव्ह रुग्ण – 94
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 80
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 129
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 94
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 81
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 61
    # शहरातील कोरोना बाधित नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 4
    #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 21
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 18902
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 58983

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.