Pimpri: दिलासादायक!; ‘तबलीगी जमात’शी संबंधित पॉझिटीव्ह रुग्णाचे दोनही ‘रिपोर्ट निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज – पिंपरी शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची पन्नाशी ओलांडली असताना आणि दररोज रुग्ण संख्येत वाढ होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासातील दोनही ‘रिपोर्ट निगेटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे हा रुग्ण ‘कोरोनामुक्ती’च्या दिशेने आहे. दरम्यान, रुग्णाची प्रकृती पाहून घरी सोडल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले. तर, ‘तबलीगी जमात’शी संबंधितच असलेल्या एका रुग्णाचे काल 14 दिवसानंतरचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 आणि त्यांच्या संपर्कातील पाच नातेवाईक अशा 28 जणांपैकी 2 जणांचे रिपोर्ट 2 एप्रिल रोजी ‘पॉझिटीव्ह’ आले होते. त्यातील एका रुग्णाचे 14 दिवसानंतरचेही रिपोर्ट गुरुवारी (दि. 16) पॉझिटीव्हच आले होते. त्यामुळे प्रशासनापुढे चिंतचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आज (शुक्रवारी) एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

महापालिका प्रशासनाने ‘तबलीगी जमात’शी संबंधित असलेल्या दुस-या पॉझिटीव्ह रुग्णाचे 14 दिवसाच्या उपचारानंतरचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थाकडे (एनआयव्ही) पाठविले होते. त्यात या रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यानंतर प्रशासनाने 24 तासानंतरचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविले होते. त्यातही या रुग्णाचे दुसरे रिपोर्ट देखील निगेटीव्ह आले. त्यामुळे हा रुग्ण ‘कोरोनामुक्ती’च्या दिशेने आहे. त्याची प्रकृती पाहून घरी सोडण्यात येणार असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 52 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाबाधित सक्रिय 39 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 35 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, चार सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.