Pimpri: कच-याच्या निविदेची सुनावणी पुर्ण, निकाल बाकी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या निविदाप्रकरणी ठेकेदाराने न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असला, तरीदेखील निर्णय न झाल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. या दाव्याचा निकाल प्राधान्याने देण्याची उच्च न्यायालयाला विनंती करण्याची सूचना स्थायी समितीने प्रशासनाला केली आहे.

महापालिका प्रशासनाने शहराचे दोन भाग करून आठ वर्षांसाठी दोनच ठेकेदारांना कचरा संकलनाचे काम देण्याचा निर्णय घेतला. परंतु, आरोपांच्या फैरींमुळे वादग्रस्त ठरलेली ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना या निवेदेशी संबधित ए. जी. एन्व्हायरो या ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया थांबली आहे.

पहिल्या निविदेमध्ये शहराच्या एका भागासाठी बीव्हीजी कंपनी आणि दुसऱ्या भागासाठी मे. ए.जी. इनव्हायरो इंफ्रा. कंपनीस काम देण्यात आले आहे. या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने स्थायी समितीने हे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला. नंतर प्रशासनाने फेरनिविदा काढल्यानंतर पुन्हा दर कमी केल्याने स्थायीने त्या दोन ठेकेदारांना काम देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, प्रशासन फेरनिविदेवर राबविण्यावर ठाम राहिल्याने ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही निविदा चार भागात काढली असून एकूण सुमारे 45 कोटी खर्चाचे हे काम आहे. आधीच्या निविदेत पात्र ठरलेल्या ठेकेदारांपैकी बीव्हीजीने पुन्हा निविदा भरली. परंतु, ए. जी. इनव्हायरो या फेरनिविदेत सहभाग घेतला नाही. त्यानंतर ए. जी. एनव्हायरो कंपनीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी फेरनिविदेवर आक्षेप घेतला आहे.

कचरा निविदा प्रक्रियेचे चुकीचे नियोजन आरोप आणि वादामुळे यापूर्वीच या कामाला विलंब झाला आहे. त्यात ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्याने या निविदा प्रक्रियेत पुन्हा अडचणींची भर पडली आहे. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली आहे. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. 15 तारखेला यावर सुनावणी झाल्यानंतर आठवडाभरता निकाल येणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही हा निकाल न लागल्याने कचराप्रश्‍नी महापालिकेकडून जुन्या ठेकेदारालाच मुदतवाढ देण्याच्या पर्यायाचा अवलंब केला जात आहे.

याबाबत बोलताना स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, ”ठेकेदाराच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. त्यावर अद्यापही निर्णय देण्यात आलेला नाही. लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यास, कचराप्रश्‍न आणखी गंभीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दाव्यासंदर्भातील निकाल प्राधान्याने देण्याची विनंती महपालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाला करावी. निकाल लवकर आल्यास पुढील प्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा होईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.