Pimpri: ‘कोरोना पूर्व चाचणी करणारी बस आठवड्याभरात बंद, आयुक्तांना माहीतच नाही’

Pimpri: 'Corona pre-test bus closed for a week, commissioner shravan hardikar doesn't know' पालिका मुख्यालयात या बसचे 20 मे रोजी महापौर, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले. त्याचा गाजावाजा केला.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या महामारीत पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन किती गलथान कारभार करत आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. कोरोना बाधितांची संख्या लवकर समजण्यास मदत व्हावी या हेतूने शहरातील नागरिकांची कोविड पूर्व चाचणी करणारी बस थाटामाटात सुरु केली. पण, पालिकेने करारनामा न केल्याने आठवड्याभरातच संबंधितांनी बस बंद केली.

विशेष म्हणजे बस बंद असल्याचा साधा ‘मागमूस’ही आयुक्तांना नाही. त्यामुळे आयुक्त किती ‘अपडेट’ आहेत हे समोर आले. बस बंद असल्याने झोपडपट्टी, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची पूर्व तपासणी होत नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्यांमध्ये रुग्ण वाढ होत आहे. त्यामुळे झोपडपट्या, कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊन नागरिकांची कोविड पूर्व चाचणी करण्याची तयारी चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टिक या कंपनीने दाखविली.

धोकादायक, जोखमीचे काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यासाठी वातानुकुलीत आणि वैद्यकीय साहित्यांनी सुसज्ज टेस्टिंग बस उपलब्ध करून दिली.

पालिका मुख्यालयात या बसचे 20 मे रोजी महापौर, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले. त्याचा गाजावाजा केला. मोठी प्रसिद्धी मिळविली.

कृष्णा डायग्नोस्टीक यांचे प्रत्यक्षात कामकाज 25 मे पासून सुरु झाले. शहरातील झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिक व दुर्धर आजाराने त्रस्त व ज्येष्ठ नागरिकांची कोवीड पूर्व चाचणी सुरु केली.

महापालिका सांगेल त्या ठिकाणी जात जोखीम घेऊन तपासण्या केल्या जात होत्या. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या लवकर समजण्यास मोठी मदत होत होऊ लागली होती.

तथापि, ही बस आठवड्यातच बंद झाली. महापालिकेने कामाचा करारनामा करण्यास टाळाटाळ केली. लेखी करारनामा नसल्याने कृष्णा डायग्नोस्टिकने बस बंद केली.

विशेष म्हणजे तब्बल 13 दिवसांपसून बंद असूनही त्याची पुसटशीही कल्पनाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नाही. आपले अधिकारी खाली काय काम करतात हे आयुक्तांना माहिती नाही.

आपत्तीच्या काळातही प्रशासन एवढे निष्काळीजीपूर्वक काम कसे करु शकते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बस बंद असल्याने झोपडपट्टी, कंटेन्मेंटमधील नागरिकांची कोविड पूर्व तपासणी होत नाही. त्यामुळे रुग्ण वाढीची भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कृष्णा डायग्नोस्टिक यांच्यासमवेत कार्योत्तर करारनामा करण्यास स्थायी समितीने 27 मे रोजी मान्यता दिली. त्याला तब्बल 22 दिवस उलटून गेले. तरी प्रशासन साधा करारनामा करु शकले नाही. आपत्तीच्या काळातही प्रशासन असे निष्काळजीपूर्वक कामकाज करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

बस बंदबाबत माहिती नाही, तपासतो

”शहरातील नागरिकांची कोविड पूर्व चाचणी करणारी कृष्णा डायग्नोस्टिक यांची बस बंद असल्याबाबत माहिती नाही. तपासून पाहतो.”, अशी प्रतिक्रिया आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

 

तांत्रिक कारणास्तव बस बंद आहे

”कोविड पूर्व चाचणी करणारी बस आम्ही सुरु केली होती. महापालिका सांगेल तिथे जाऊन नागरिकांची तपासणी करत होतो. आठ ते दहा दिवस काम केले. त्यानंतर तांत्रिक कारणास्तव बस बंद आहे”, असे कृष्णा डायग्नोस्टिकच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.