Pimpri Corona Update: रुग्णसंख्या वाढल्याने शहर पुन्हा ‘रेडझोन’मध्ये -आयुक्त श्रावण हर्डीकर

नियमात बदल केला जाणार नाही. पण, जास्त रुग्ण असलेल्या अस्थापना करणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे पुन्हा शहराचा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आल्याची  माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. नियमात बदल केला जाणार नाही. पण, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण सापडले. तर ती बंद करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. राज्य सरकारने 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले होते. 22 मे रोजी शहरात केवळ 265 रुग्ण होते. मात्र, रेडझोनमधून वगल्यापासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. रुग्णसंख्या 25 हजार 495 वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराला पुन्हा रेडझोनमध्ये समाविष्ट करावा असा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे शहर आता पुन्हा रेडझोन असणार आहेत.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे शहर रेडझोनमध्ये समाविष्ट झाले आहे. पण, आपल्याला रेडझोनमध्ये असणे निश्चितपणे मानवणारे नाही. कारण, ही औद्योगिकनगरी आहे. ज्या कंपनीत, दुकानामध्ये पॉझिटीव्ह रुग्ण सापडतात. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या सापडल्यास आस्थापना काही कालावधीसाठी बंद केल्या जातील. काही कंपन्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडले होते. त्या कंपन्या तात्पुरत्या बंद केल्या होत्या. पण, ज्या आस्थापनांमध्ये एखादा रुग्ण सापडल्यास त्यांचे ट्रेसिंग करुन तपासणी करतो. रुग्णसंख्येनुसार कंपनी परिसर निर्जुंतीकरण पुन्हा चालू केली जाते.  नागरिकांनी बाहेर पडताना सुरक्षित अंतराचे पालन करावे. कायम मास्कचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.