Chinchwad: शहरातील मॉल्स झाले सुरू, खरेदीसाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद

Chinchwad: The malls in the city have started functioning, but little response from customers ब्रँडेड कपडे विविध वस्तू आणि मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध असलेल्या मॉल्समध्ये एरवी मोठी गर्दी पाहायला मिळते.

एमपीसी न्यूज – देशात 23 मार्च रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि सर्व ठिकाणी त्याची कडक अंमलबजावणी सुरु झाली. त्यानुसार बंद करण्यात आलेले मॉल्स 5 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोन बाहेरच्या मॉल्स, शॉपिंग सेंटर सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, नागरिकांनी मॉल्समधील खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल चार महिन्यांहून अधिक काळासाठी देशातील मॉल्स, शॉपिंग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टींना शिथिलता देत हळूहळू आस्थापना सुरू झाल्या.

देशात 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या अनलॉक 3 च्या अंतर्गत कंटेनमेंट झोन बाहेरच्या शॉपिंग सेंटर, मॉल्स, योगा सेंटर यांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सुरू झालेल्या मॉल्समध्ये खरेदीसाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. शहरात मॉल्समधील खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

ब्रँडेड कपडे विविध वस्तू आणि मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध असलेल्या मॉल्समध्ये एरवी मोठी गर्दी पाहायला मिळते. पण, लॉकडाउन नंतर सुरू झालेल्या मॉल्समध्ये अगदी बोटावर मोजता येतील इतकेच ग्राहक खरेदीसाठी आल्याचे दिसून येत आहे.

त्यातही मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू व किराणा स्टोअर मधील खरेदीसाठी ग्राहक जास्त पसंती देत असल्याचे शहरातील मॉल्समध्ये चित्र आहे. मॉल्स सुरु झाले असले तरी चित्रपटगृह, रेस्तराँ व खाद्यपदार्थांचे आउटलेट यांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मॉल्स सुरु झाले असले तरी फार कमी लोकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.

मॉलमध्ये प्रवेश करताना आरोग्य सेतू ॲपबाबत विचारणा केली जात आहे तसेच ते डाऊनलोड करण्याची विनंती केली जात आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टॅन्ड उभे करण्यात आले आहेत व कोणत्याही स्टोअरमध्ये जात असताना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.

फिजिकल डिस्टन्सिंगचे योग्य पालन व्हावे यासाठी ठिकाणी फ्लोवर वर पावलांची चिन्हं तयार करण्यात आली आहेत. मॉल्समधील अनाउन्समेंट स्पीकर च्या माध्यमातून वेळोवेळी कोरोना संबंधित सुरक्षेच्या सूचना देण्यात येत आहेत.

दिवसेंदिवस शहरात कोरोना बाधित रुग्णांची लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे मॉल्स सुरू होऊन देखील नागरिक मॉल्समधील खरेदी टाळतानाच दिसून येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.