Pimpri: शहरात कोरोनाचे 1130 ‘ॲक्टिव्ह’ रुग्ण

1130 coronavirus 'active' patients in Pimpri Chinchwad. आजपर्यंत 2888 जण बाधित, 1713 झाले बरे, 1130 रुग्णांवर उपचार सुरु; 45 जणांचा मृत्यू

आजपर्यंत 2888 जण बाधित, 1713 झाले बरे, 1130 रुग्णांवर उपचार सुरु; 45 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच  आहे. काही दिवसांपासून दिवसाला दीडशेहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 2888 जणांना बाधा झाली आहे. त्यापैकी 1713 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आजमितीला 1130 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाने 45 जणांचा आजपर्यंत बळी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, अर्धा मे महिन्यापर्यंत महापालिका   परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकली. त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात राहिली.

परंतु, मे महिन्याच्या मध्यानंतर शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. दिवसाला 100 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ होऊ लागली.

मागील काही दिवसांपासून दररोज दीडशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांनी देखील एक हजारचा आकडा पार केला आहे. दरम्यान, जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या 10 हजारापर्यंत जाईल, अशी शक्यता महापालिका प्रशासनाने वर्तविली आहे.

10 मार्च ते 28 जूनपर्यंत शहरातील 2888 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आजपर्यंत 1713 जणांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.83 टक्के आहे.

आजमितीला 1130 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचे प्रमाण 38.54 टक्के आहे. तर, शहरातील 45 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. त्याचे प्रमाण कमी आहे. 1.61 मृत्यूचे प्रमाण आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

आत्तापर्यंत 22 ते 39 वय वर्ष असलेल्या शहरातील 1120 युवकांना कोरोनाची  लागण झाली आहे. हे  प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वय वर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 766 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वय वर्ष असलेल्या 373 तरुणांना कोरोनाची लागण झाली, तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 307 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 319 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

1130 सक्रिय रुग्णांपैकी  957 रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत !

शहरात आजमितीला कोरोनाच्या 1130 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 957 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. प्रशासनाकडून ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

तर, लक्षणे नसलेले रुग्ण कोरोनावाहक होऊ शकतात, असे सांगत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तर, 134 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 34 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.