Pimpri : पिस्तुल नकली असल्याचे म्हटल्यावरून तरुणावर गोळीबार!

एमपीसी न्यूज – पिस्तुल नकली असल्याचे म्हटल्यावरून एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये तरुणाच्या खांद्याला गोळी लागली असून त्याच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि. 2) मध्यरात्री एक वाजता डीलक्स मॉलसमोर पिंपरी गाव येथे घडली.

गुरप्रीत हरदेवसिंग जावंद (वय 22) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी परदेशी / रोकडे (वय 27, रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गुरप्रीत हरदेवसिंग जावंद, त्याचा मित्र सिद्धांत सुनील बहोत (वय 21) हे दोघे डीलक्स मॉलसमोर पिंपरी गाव येथे रिक्षामध्ये बिअर पित गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सनी परदेशी उर्फ रोकडे (वय 27) हा तिथे आला. त्याने त्याच्या खिशातून पिस्तुल काढले. गुरप्रित याने ते पिस्तुल खोटे असल्याचे सांगितले. त्यावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्यातूनच जीवे मारण्याच्या उद्देशाने सनी याने गुरप्रित याच्यावर गोळी झाडली. ती गोळी गुरप्रित याच्या डाव्या खांद्याला लागली.

गुरप्रित याला तात्काळ उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.