Pimpri: सत्ताधा-यांनी केला महासभांचा खेळखंडोबा; जुलै महिन्याची सलग तिस-यांदा सभा तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एकहाती सत्ता असलेल्या भाजपने सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात 44 वेळा सभा तहकूब केली आहे. जुलै महिन्याची सभा तहकूब करण्याची तर ‘हॅटट्रीक’च केली आहे. मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचे आयुध वापरून तहकूब होणा-या सभांमुळे वेळेच्या अपव्ययाबरोबरच शहर विकासाला प्रतिरोध झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांचे नियोजन करणे. त्यावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी महिन्यातून एखदा महासभेचे आयोजन केले जाते. परंतु, सत्ताधारी भाजपने गेल्या सव्वा दोन वर्षात तब्बल 44 वेळा तहकूब करण्याचा विक्रम केला आहे. नियमित पक्ष बैठक, धोरणात्मक निर्णयावर एकमताचा अभाव, सत्ताधा-यांमधील गटबाजी यामुळे सभा तहकुबींची आफत सत्ताधा-यांवर ओढवत आहे.

  • भाजपच्या सभा तहकुबींच्या ‘तारीख पे तारीख’ धोरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव लालफितीत अडकत आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिकेत भाजपचे 77 नगरसेवक आहेत. 14 मार्च 2017 रोजी पहिली सभा होवून नवीन सभागृह अस्तित्वात आले. मात्र, सभेच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांमध्ये उदासिनता आहे. मागील सव्वा दोन वर्षाच्या कालावधीत 32 सभा झाल्या. सभा तहकुबीच्या सपाट्यामुळे 76 वेळा सभा घ्याव्या लागल्या. त्यातही 44 वेळा सभा तहकूब करण्यात आल्या.

मान्यवरांना श्रध्दांजली म्हणून काही मिनिटे सभा तहकूब करुन पुन्हा सभेचे कामकाज सुरु करणे अपेक्षित असताना महिना – महिना सभा कामकाज पुढे ढकलण्यात येत आहेत. वादग्रस्त प्रस्तावांवरील चर्चा टाळणे, प्रस्तावांची ‘सेटींग’, पक्षांतर्गत राजकारण, गटबाजी, प्रशासनावर दबाव आदींसाठी सभा तहकुबीचे राजकारण केले जात आहे.

  • आता जुलै महिन्याची सभा 20 ऑगस्टला होणार!
    जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा पहिल्यांदा 25 जुलै पर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर 6 ऑगस्टपर्यंत आणि आज गणसंख्येचे कारण देत तिस-यावेळी सभा 20 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याची अशा दोन्ही सभा 20 ऑगस्टला होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.