Pimpri : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांनी केले अभिवादन

एमपीसी न्यूज – समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि जातीवाद निर्मूलनासाठी काम केलेले आणि लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज (रविवारी) महापालिकेच्या मुख्य इमारतीत त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माहिती व जनसपर्क विभागाचे रमेश भोसले, स्वप्नील पांचाळ व कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर यांचा जन्म 1105 मध्ये बागेवाडी, कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला होता. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते. एक महान तत्त्वज्ञानी, समाज प्रबोधक व प्रसिद्ध कवी होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातीच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्री दास्यत्व, जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला व मरगळलेल्या समाजात त्या काळात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.