Pimpri News: दररोज पाणीपुरवठा करु शकले नसल्याची खंत – महापौर उषा ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना एकदिवसाआड पण पुरेसे पाणीपुरवठा केला. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा,भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारी 2022 पासून शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करायचा होता. पण, तो होऊ शकला नाही याची खंत असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवारी (दि.13) रोजी संपत आहे. उद्या शनिवार, रविवार महापालिकेला सुट्टी आहे. रविवारी नगरसेवक आणि महापौरपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने महापौर उषा ढोरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यावेळी उपस्थित होते.

महापौरपदी मला 24 महिने काम करण्याची संधी मिळाली. महापौरपदी निवड होताच कोरोनाची महामारी आली. कोरोना काळात दिवसरात्र काम करुन नागरिकांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. सक्षम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासनानेही कोरोना महामारीत चांगले काम केले. त्यामुळेच शहरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी राहिला. कोरोनाने पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी उमेद जागर कार्यक्रम घेतला. त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले. लॉकडाऊन असतानाही शहराचा विकास थांबू दिला नाही. निगडी रोटरी पुल, नवीन चार हॉस्पिटल, कुस्ती केंद्र, पूर्णानगर येथील उद्यान अशी विविध विकास कामे मार्गी लावली. लोकांच्या सेवेत खुली केली असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांना एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परंतु, पुरेशा दाबाने पाणी दिले. त्यामुळे एकाही महिलेचे पाणी टंचाईबाबत तक्रार आली नाही. जानेवारी 2022 पासून दररोज पाणीपुरवठा करायचा होता. पण, त्यात यश आले नाही. ही खंत माझ्या मनात राहील. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते काम लवकरच पूर्ण होऊन शहरवासीयांना दररोज पाणी मिळेल. या कामाला गती देऊ शकले याचे समाधान आहे. पण, माझ्या कारकिर्दीत दररोज पाणीपुरवठा झाला असता तर समाधान वाटले असते, असेही महापौर ढोरे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.