Pimpri : उद्योगनगरीत ‘सन्नाटा’… दुकाने, उद्योगांचे ‘शटडाऊन’

एमपीसी न्यूज- ‘कोरोना’ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे महत्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली आहे. या हाकेला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहरवासीयांचा ‘जनता कर्फ्यू’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील चौक, गल्लीबोळ, उद्योग परिसरात स्मशान शांतता पाहायला मिळाली. मात्र, चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दरम्यान, दररोज ऐकू येणारे विविध वाहनांचे आवाज आज गायब झाले आणि त्यांची जागा पक्षांच्या किलबिलाटाने घेतली.

चिंचवड, पिंपरी, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, मोशी, भोसरी परिसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळत घरातच राहणे पसंद केले. औद्योगिक कंपनी, लघु उद्योग, शोरूम व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एरवी वर्दळीची असणारे रस्ते सुमसान होते. बेजवाबदारपणे बाहेर फिरणाऱ्या काही नागरिकांना थांबवून पोलीस त्यांची चौकशी करत होते. पिंपरी व चिंचवड भाजीमंडईमध्ये चिटपाखरू सुद्धा फिरकले नाही. एकंदरीत ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

_MPC_DIR_MPU_II

सकाळी सात वाजल्यापासूनच शहर बंद असून, रस्त्यावर वाहन आणि लोक दिसत नाहीत, बस स्थानके, मुख्य बाजारपेठांमध्ये संपूर्ण शांतता पाहायला मिळाली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुद्धा वाहनांची ये -जा नव्हती, सफाई कर्मचारी, नर्स व अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी बस सेवा सुरु ठेवण्यात आलेली होती. तरीही या बसेस विना प्रवासी धावत होत्या. पीएमपीकडून भोसरी, पुणे स्टेशन, मनपा या रूटवरील बस सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. सर्वच ठिकाणचे पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवण्यात आले होते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून कोरोना बाधितांची संख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. या विषाणूचा संसर्ग थांबवायचा असेल तर लोकांनी सरकारनी सांगितलेल्या नियमांचे काटेखोर पालन कारावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात लोक स्वयंस्फूर्तीनं कर्फ्यू पाळत आहे. अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही घरीच आहेत. त्यांनी तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मी पण घरी आहे. तुम्हीही घरीच थांबा असं ट्विट करत आवाहन केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.