Pimpri: वारक-यांच्या स्वागतासाठी औद्योगिकनगरी सज्ज

पोलिसांचा कडक बंदोबस्त; पालिका पुरविणार मुबलक सोयी-सुविधा

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणा-या सर्व वारक-यांसाठी आकुर्डी येथे निवास, पाणी, विद्युत व शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्ती करण्यात येत असून सर्व वारक-यांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

जग्‌दगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी 334 वा पालखी सोहळ्याचे आज (सोमवारी) देहूगावातून प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याचे मंगळवारी शहरात आगमन होणार असून आकुर्डी येथे दुसरा मुक्काम असणार आहे. वारक-यांच्या स्वागतासाठी औद्योगिकनगरी सज्ज झाली आहे.

  • सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखी आगमनापासून ते मार्गास्थ होण्यापर्यंत सर्व सोयी-सुविधा मुलबक प्रमाणात देण्यात येणार आहेत. भक्ती-शक्ती ते दापोडीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. आकुर्डीतील पालखीच्या मुक्काम तळावर सर्वांना दर्शन घेता यावे. महिला आणि पुरुषांसाठी वेगळ्या दर्शरांगा करण्यात येणार आहेत. वारक-यांसाठी मुक्कामाची व्यवस्था महापालिका शाळा इमारतींमध्ये करण्यात येणार आहे.

त्याठिकाणी पुरेशी पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आलेली आहे. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना, आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शनबारी साठीची व्यवस्था, पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले असून कचराकुंड्या स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

  • तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (दि. 26)दिघी मॅगझीन चौक, भोसरी येथे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था तसेच सुमारे 500 पोर्टेबल फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली.

तसेच एक अग्निशमन वाहन सुसज्ज पथकासह पंढरपूरपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पालखी सोहळा कालावधीत शहरात स्वच्छता ठेवणे, पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते स्वच्छ ठेवणे व पालखी मार्गक्रमणामध्ये चोख व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्याचे, पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.