Pimpri : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथे विविध कार्यक्रम

11 ते 15 एप्रिल पर्यंत विचार प्रबोधन पर्व पिंपरी येथे रंगणार

एमपीसी न्यूज –  क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारका शेजारील  (Pimpri) मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. 11 ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजता प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रबोधन पर्वात महानाट्य, लाईव्ह कॉन्सर्ट, गीत गायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, मतदान जनजागृती अशा विविध कार्यक्रमांचे (Pimpri) आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधन पर्वात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

गुरुवार दि.11 एप्रिल सकाळी 10 वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी यांच्या गाथा महापुरुषांची या महामानवांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांच्या कार्यक्रमाने प्रबोधनपर्वास सुरूवात होणार आहे. सकाळी 11.30 वाजता उषा कांबळे  यांचा  महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दुपारी 12.30 वाजता मधुकर कदम आणि त्यांचे सहकारी पारंपारिक संगीत वाद्यातून महापुरुषांना अभिवादन तसेच मतदान जनजागृती कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी 2 वाजता महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी 3.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय मोहड यांचा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले लिखित अखंडावर आधारित स्वर फुलोरा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.  सायंकाळी 5 वाजता धम्मा विंग्स, मुंबई प्रस्तुत जयभीम रॉक बॅण्ड या कार्यक्रमाद्वारे महापुरुषांना संगीतमय अभिवादन करण्यात येणार आहे.  सायंकाळी 7 वाजता राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गायक अमित जाधव यांच्या सूर क्रांतीचा आवाज महापुरुषांचा या संगीत-नृत्य-नाट्य-गीतांच्या अविष्काराने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता होईल.

शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्थानिक कलावंत महापुरुषांना गीतगायनातून मानवंदना देणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ब्लू मून एंटरटेन्मेंट प्रस्तुत “कांबळेची वरात” हे समाज प्रबोधनपर धमाल विनोदी नाटक सादर होणार आहे. विजय गायकवाड या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक तर राजपाल वंजारी निर्माते आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता कुणाल बोदडे आणि सा.रे.ग.म.पा फेम रागिणी बोदडे यांची  वैचारिक गीतांची संगीतमय मैफिल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2.30  वाजता सुप्रसिद्ध कव्वाल सुरज आतीश, विशाल वाकोडे, स्नेहल वानखेडे आणि सहकाऱ्यांचा प्रबुद्ध हो मानवा हा गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सायंकाळी 4 वाजता काव्य संगीताद्वारे युगप्रवर्तकांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ गायक तथा कवी ललकार बाबु, नांदेड येथील मानकर बाबु कव्वाल, यवतमाळ येथील कमलेश पाटील, वर्धा येथील सुदेश कांबळे यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता संकल्प गोळे यांचा अभिवादनपर गीतगायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड गीतकार तथा शायर प्रणय सतलज यांचा विशेष सहभाग असणार आहे. रात्री 7 वाजता स्वरांचे बादशहा विजय सरतापे यांच्या प्रबोधनाची भीम सरगम या गीतगायनाच्या कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.

शनिवार  दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्थानिक कलावंतांचा महामानवांची प्रबोधनात्मक गौरवगाथा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळी 11.30 वाजता निर्माते तथा गायक कबीर नाईकनवरे यांचा संगीत आणि निवेदनातून प्रबोधनात्मक गीतांचा जलसा – सलाम संविधान हा कार्यक्रम सादर होणार आहे.  दुपारी 1 वाजता ख्यातनाम लोकगायिका कडूबाई खरात यांचा गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

तसेच दुपारी 3 वाजता प्रसिद्ध गझलकार अशोक गायकवाड यांची रथ भीमाचा हा नेऊ पुढे ही गझल गीतांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. यानंतर सायंकाळी 4.30 वाजता स्वरांगण दृष्टीहीन संस्थेतील अंध कलाकारांतर्फे जिनिअस स्टार्स हा गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भारत लोणारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7.30वाजता सुप्रसिद्ध संगीतकार, सिनेपार्श्वगायक, निवेदक, अभिनेते अवधूत गुप्ते यांच्या बहारदार भीमगीतांच्या कार्यक्रमाच्या  लाइव्ह कॉन्सर्टने तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.

रविवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता मुंबई विद्यापिठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांच्या धम्मपहाट या कार्यक्रमाने दिवसाची सुरूवात होणार आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता प्रबोधनपर्वामध्ये वीर बापूराव शेडमाके आदिवासी नृत्य पथक यांच्या वतीने आदिवासी कलानृत्यातून महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. यामध्ये संजय उईके, स्नेहा चिमूरकर आणि सहकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. सकाळी 9.30 वाजता वंदना व समता सैनिक दलाच्या वतीने महामानवांना मानवंदना देण्यात येणार असून 10 वाजता प्रबोधनकार तथा कव्वाल विनोद फुलमाळी यांचा स्मरण युगंधराचे हा प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यानंतर 10.15 वाजता एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी 12 वाजता संगीतमय अविष्कार.. गौरव भीमरायाचा  या कार्यक्रमात विविध संगीत वाद्यातून आणि शिल्पकलेतून महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात जयेंदू मातोश्री प्रोडक्शन आणि शिल्पकार उत्तम साठे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 2 वाजता सिनेपार्श्वगायक मुज्तबा अजीझ नाझा यांच्या कव्वालीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजता सुप्रसिद्ध पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या गीतांची संगीतमय मैफिल आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 6 वाजता सिनेपार्श्वगायक तसेच बिग बॉस फेम डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांचा भिमगीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट – शिंदेशाही हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रात्री 8.30  वाजता ख्यातनाम गायक, संगीतकार, सिनेकलाकार नंदेश उमप यांच्या महामानवांच्या गीतांचा महाजलसा या कार्यक्रमाने चौथ्या दिवसाची सांगता होणार आहे.

सोमवार, दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्थानिक कलाकार महामानवांच्या विचारांचा संगीतमय जागर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्रातील विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 11.45 वाजता सुमेध कल्हाळीकर यांच्या महापुरुषांच्या परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात अनिरुद्ध सूर्यवंशी, वैशाली नगराळे, सुनील गायकवाड यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 1.15 वाजता आंबेडकरी गीतांची प्रबोधनात्मक मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलमध्ये रोमिओ कांबळे, मुन्ना भालेराव, सागर येल्लाळे, संगीता भंडारे या कलाकारांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर दुपारी 2.45 वाजता सुधाकर वारभुवन, मारूती जकाते, सुमन चोपडे, सत्यभामा मस्के यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4.15 वाजता गायक विशाल ओव्हाळ, धीरज वानखेडे, छाया कोकाटे, मिलिंद शिंदे यांचा महामानवांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सायंकाळी 6 वाजता एच.ए.मैदान, पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 150 कलावंताचा सहभाग असलेले, राष्ट्रीय पातळीवर गाजलेले, तीन मजली अतिभव्य मंच असलेले, दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेले तसेच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले जतिन पाटील दिग्दर्शित काळजाचा ठाव घेणारी अप्रतिम कलाकृती – मूकनायक या महानाट्याने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.