Pimpri : पूर बाधित तीन हजार नागरिकांचे स्थलांतर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या पुराच्या संकटातून नागरिकांना वाचवण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज (रविवारी) या दोन्ही विभागाच्या जवानांनी पूर बाधित परिसरातील तीन हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.

पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या पिंपरी चिंचवड शहरातून वाहतात. या नद्यांवर असलेली धरणे पूर्णतः भरलेली असून त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यातच धरण साखळीमध्ये व शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना पूर आला आहे.

  • नद्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी शहरातील अनेक परिसरात गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. वाहतूक विभागाकडून अनेक रस्ते, चौक, पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ठिकठिकाणी नऊ बचाव छावण्या उभारण्यात आला आहेत. पुरबधित परिसरातील नागरिकांचे या बचाव छावण्यांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात येत आहे. या नऊ बचाव छावण्यांमध्ये तीन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याचबरोबर पुरबधित क्षेत्रात निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध असणा-या पाच हजार नागरिकांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग तीन शिफ्टमध्ये 24 तास काम करीत आहे.

  • पुढील 48 तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे, तसेच पूरग्रस्त भागात जाऊन सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मदतीसाठी नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी (39331556 / 39331111) संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.