Pimpri: लॉकडाऊनमध्ये 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पालिकेचे कामकाज चालणार

Pimpri: Municipal Corporation will function in the presence of 10 percent employees in the lockdown नागरिकांना 23 जुलैपर्यंत पालिकेत नो-एंट्री असणार आहे.

एमपीसी न्यूज- आजपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाज 10 टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांना 23 जुलैपर्यंत पालिकेत नो-एंट्री असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाची साखळी घट्ट झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी, वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात आजपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. दहा दिवस म्हणजेच 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ही टाळेबंदी असणार आहे.

या कालावधीतील पालिकेतील कर्मचारी संख्या देखील कमी करण्यात आली आहे. पालिका कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती पुढील आदेश होईपर्यंत 10 टक्के ठेवण्यात येणार आहे.

पालिकेच्या सर्व कार्यालयांना या सूचना लागू राहतील. तथापि, आपत्कालीन, अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा (पाणीपुरवठा, विद्युत, रुग्णालये, आरोग्य, वैद्यकीय विभागातील) तसेच कोरोनाच्या कामकाजाकरिता ज्या अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्त्या केल्या असतील. अथवा भविष्यात केल्या जातील. त्यांना लागू राहणार नाही.

तसेच कोरोना कामकाजाकरिता नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी वगळून कार्यालयामध्ये विनिर्दिष्ठ केलेल्या मर्यादेमध्ये उपस्थिती अनिवार्य राहिल. कार्यालयात कर्तव्यावर नियुक्त केलेल्या कर्मचा-यांचे कार्यालयीन आदेश विभाग प्रमुखांनी निर्गत करावी.

त्याची प्रत प्रशासन विभागात सादर करावी. ज्या कर्मचा-यांची सद्यस्थितीत कोरोनासाठी नियुक्ती केलेली नाही. तसेच कार्यालयाने 10 टक्के उपस्थितीच्या मर्यादेत पारीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये ज्या कर्मचा-यांना कार्यालयीन कामकाजाचे आदेश नसतील.

अशा कर्मचा-यांची नावे स्वतंत्ररित्या प्रशासन विभागास तात्काळ अवगत करावीत. अधिकारी, कर्मचा-यांनी पालिका कार्यक्षेत्र सोडू नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे. याशिवाय नागरिकांना पालिकेत प्रवेश न देण्याच्या आदेशात वाढ केली आहे. नागरिकांना 23 जुलैपर्यंत पालिकेत प्रवेश मिळणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.