Pimpri News : महिलांना सन्मान आणि सामान्यांना महागाई देणारा अर्थसंकल्प – मानव कांबळे

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वागतार्ह योजना जाहीर केल्या आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे, पण सामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

कांबळे म्हणाले, महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2021-22 चा अर्थसंकल्प सोमवारी विधानसभेत सादर केला. यामध्ये महिलांच्या नावाने गृह खरेदीसाठी एक टक्के मुद्रांक शुल्क सवलत, शाळेत व महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी मोफत एसटी प्रवास, घरकाम करणाऱ्या महिला कामगारांसाठी विमा योजना यासारख्या योजनांची घोषणा केली.

तसेच, शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज व थकीत वीजबिलावर 30 टक्के सवलत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधार मिळणार असल्याचे मत कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

कांबळे पुढे म्हणाले, देशात पेट्रोल डिझेलचे दर आकाशाला भिडले असताना राज्य सरकार कर सवलत देईल अशी अपेक्षा होती, परंतु या बाबतीत मात्र या अर्थसंकल्पाने पूर्णपणे निराशा केली आहे. इंधन दर वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढ होते, यामुळे महागाईचे चटके सामान्य जनतेला बसणार आहेत.

राज्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी त्यांची अन्नसुरक्षा कायम व व्यापक बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करणे गरजेचे होते, या बाबीकडेही या अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाल्याचे कांबळे यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.