Pimpri News: जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीच्या दरवाढीसाठी समितीची नेमणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीचा दर वाढविण्याकरिता आणि इतर संलग्न कामासाठी बायोमेडिकल वेस्ट डिस्पोझेबल समितीची नेमणूक केली आहे. त्यानुसार कचरा विल्हेवाटीचे कामकाज करणाऱ्या संस्थेस करारनामा कालावधीत दरवाढ द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय समितीमार्फत घेतला जाणार आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात 32 दवाखाने आहेत. तर, आठ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांसह संलग्न रुग्णालयांमधून जैव वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. हा जैव वैद्यकीय घनकचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे, या कामासाठी पास्को यांना कंत्राट देण्यात आले आहे. हा प्रकल्प बांधा, विकसित करा आणि वापरा या तत्त्वावर पास्को यांना चालविण्यास देण्यात आला. 1 एप्रिल 2005 पासून जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचे सर्व कामकाज ते करीत आहेत. 21 फेब्रुवारी 2006 रोजी पास्को यांच्यासमवेत केलेला करारनामा आणि दिलेला आदेश रद्द करून त्यांनी विनंती केल्यानुसार, पास्को एन्व्हायरलमेंटल सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या समवेत करारनामा करून कामाचा आदेश देण्यात आला आहे.

कामात सुसूत्रता आणण्यासाठी करारनाम्यानुसार, तीन महिन्यांकरिता आगाऊ रक्कम देण्यात येऊन त्याचे समायोजन करण्यात येत होते. तथापि, बिलामध्ये सुसूत्रता राहण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने ऑक्टोबर 2009 पासून पास्को एन्व्हायरलमेंटल यांना प्रतिमहिना बिल देण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील रुग्णालये आणि महापालिका रुग्णालयांसह इतर संलग्न जैव वैद्यकीय संस्थांमधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मोशी येथे जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीचा प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. पास्को एन्व्हायरलमेंटल यांना चालू अटी-शर्तीवर नवीन प्रकल्प स्थापन करून पुढील 15 वर्षांसाठी संचालन करण्यास 13 ऑक्टोबर 2020 रोजी मान्यता देण्यात आली आहे.

मोशी येथील जागेचा भाडेकरार 15 जून 2021 ते 14 जून 2027 या कालावधीकरिता केला आहे. ही मुदत संपुष्टात येण्यापूर्वी नव्याने केलेल्या करारनामा कालावधीपर्यंत म्हणजेच 28 फेब्रुवारी 2035 पर्यंत मुदतवाढ करण्यासाठी सक्षम समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीचा दर वाढविण्याकरिता आणि इतर कामासाठी बायोमेडिकल वेस्ट डिस्पोझेबल समितीची नेमणूक केली आहे. त्यानुसार करारनामा कालावधीत डिस्पोझेबल समितीने दिलेल्या निर्णयानुसार दरवाढ केली जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.