Pimpri News: सत्ताधारी भाजपचा नाकार्तेपणा, सोसायट्यांना विहिरीतून पाणी पुरविण्याची वेळ – संजोग वाघेरे‌

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्याबाबत सत्ताधारी भाजपने सातत्याने चमकोगिरी केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी केलेला डिसेंबर 2021 अखेरपर्यंत अतिरिक्त पाणीसाठा आणण्याचा दावा फोल ठरला आहे. या मुदतीत चिखली जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. महानगरपालिकेतील या सत्ताधा-यांच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे सोसायट्यांना विहीरीतून पाणी पुरविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ यांनी केला आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे‌ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडचे वाढते नागरिकरण आणि लोकसंख्या विचारात घेऊन शहराला अतिरिक्त पाणीसाठा गरजेचा आहे. ही बाब विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून शहरासाठी आंद्रा, भामा आसखेड धेरणात पाणी कोटा आरक्षित केला. ते पाणी शहरासाठी आणण्याचे नियोजन सुरू केले. 2017 मध्ये भाजपने फसव्या घोषणा करून महानगरपालिकेची सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात शहरात दिवसातून दोन वेळा आणि किमान दररोज पाणीपुरवठा केला जात होता. 24 तास पाणी देण्याचे नियोजन त्यावेळी सुरू केले गेले. परंतु भाजपच्या हाती सत्ता गेल्यापासून शहरातील पाणीप्रश्न बिकट बनलेला आहे. शहरातील नागरिकांना दररोज एकवेळ देखील पाणीपुरवठा महानगरपालिकेच्या माध्यमातून होत नाही. भाजपला सत्ता मिळाल्यानंतर दिवसाआड शहराला पाणी पुरविले जात आहे. कोट्यवधींचा नुसता खर्च करून भाजपने शहराची फसवणूक आणि नागरिकांचा विश्वासघात केलेला आहे.

काही दिवसांपूर्वी चिखली भागात सोसाय़टीतील रहिवाश्यांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी चक्क भाजप नगरसेवकाने विहिर बांधली. त्या विहीरचे उद्घाटन सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी केल्याचे समजले. ज्या शहराला आणि तेथील नागरिकांना महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून सुरळित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सत्ताधा-यांची आहेत. ते सत्ताधारी नागरिकांना विहीरीचे पाणी वापरण्यास भाग पाडत आहेत. या पेक्षा शहरासाठी दुर्दैवी बाब कोणती ? हे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे पाच वर्षातील सर्वात मोठे अपयश म्हणावे लागेल. याचे उत्तर शहरातील सुज्ञ नागरिक आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

चिखली जलशुध्दीकरण केंद्र विलंब, भाजप जबाबदार

मागील वर्षात सत्ताधारी पदाधिका-यांनी वारंवार डिसेंबर 2021 पर्यंत शहरासाठी अतिरिक्त पाणी आणण्याच्या वल्गना केल्या होत्या. प्रत्यक्षात त्यांनी सांगितलेल्या या मुदतीत शहराला पाणी मिळालेले नाही. चिखली येथे सुरू असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. हे सर्व काम पूर्ण होऊन यंत्रणा कार्यन्वित होण्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. चिखली जलशुध्दीकरण केंद्र विलंब होऊन शहराला अतिरिक्त पाणी न मिळण्यास भाजप जबाबदार असल्याचेही वाघेरे‌ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.