Pimpri News: कोरोना नियमांचे पालन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, महापौर, आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन

एमपीसी न्यूज – यंदाचा गणेशोत्सव कोविड 19 च्या नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासीयांना केले.

दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उत्साही व आनंदी वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडू माती अथवा कागदी लगद्या यांसारख्या विघटनशील घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची 4 फुटापर्यंत असावी. तर, घरगुती गणेश मूर्तींची उंची 2 फुटापर्यंत असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) पासून बनविलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे. घरगुती आरास व देखाव्यांसाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर करू नये असेही आवाहन त्यांनी केले.

नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये याकरिता गणेश विसर्जनासाठी यावर्षी कृत्रिम गणेश विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. त्याऐवजी महापालिकेच्या वतीने गणेश मूर्तीदान व निर्माल्य दान स्वीकारण्यासाठी फिरत्या रथांची व्यवस्था शहरातील विविध भागांमध्ये करण्यात येणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास सक्त मनाई आहे. गणेश मंडळांनी श्रींची आरती व दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे. कोरोना विषाणू प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यास सक्त मनाई आहे. तसेच गणेश मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे. थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. शारीरिक अंतराचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. स्वच्छतेचे नियम पाळण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार पाण्याचा स्त्रोत दुषित करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे नदीचे पाणी दुषित होऊ नये यासाठी नागरिकांनी व गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ढोरे, आयुक्त पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.