Bhosari Crime News : पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या एका तीनचाकी टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 26) सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर पुणे लेनवर लांडगे नगर, भोसरी येथे झाला.

सौरभ बाळू जोशी (वय 20) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहन खिरु चव्हाण (वय 37, रा. सदगुरुनगर, भोसरी) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीनचाकी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि मयत सौरभ हे दोघेजण फिर्यादी यांच्या दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. ते लांडगे नगर, भोसरी येथे आले असता भरधाव वेगात आलेल्या एका तीनचाकी टेम्पोने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या तोंडाला, डोळ्याला दुखापत झाली. तर फिर्यादी यांचा सहप्रवासी सौरभ हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर टेम्पो चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.