Pimpri News: महापुरुषांच्या विचारांमुळे कोणतेही प्रसंग सहजतेने हाताळता येतात – राजेश पाटील

एमपीसी न्यूज – उपेक्षितांचे जीवनमान उंचावण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य मार्गदर्शक आणि प्रेरक ठरत आहे. आधुनिक युगातही त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा दिवसेंदिवस वाढत असून महापुरुषांच्या विचारांचे पाठबळ पाठीशी असल्यास वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही प्रसंगाला सहजतेने सामोरे जाता येईल आणि प्रसंगही हाताळता येतील. महापुरुषांचे साहित्य प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे, त्याचे नेहमी पारायण केले पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यकारी अभियंता तथा मुख्य संयोजक संजय भोसले, संयोजक सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, लेखाधिकारी प्रदीप बाराथे, विजय कांबळे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक संतोष लोंढे , उत्तम हिरवे, अंकुश कानडी, मारुती भापकर, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, शुभांगी लोंढे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रवींद्र दुधेकर, अनिल सूर्यवंशी, शरद जाधव, कामगार नेते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते अण्णा कुदळे , उत्तम कांबळे, धम्मराज साळवे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, महात्मा जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी,  शेतकऱ्याचे आसुड, ब्राह्मणांचे कसब या साहित्यातून जे विचार मांडले ते आधुनिकतेच्याही पलिकडे आहेत. सावित्रीबाई फुले यांनीही विशेष कार्य केले आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे आचरण आपल्या जीवनात केल्यास ते खरे अभिवादन ठरेल. त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक तसेच जीवनातील विविध क्षेत्रात आपले विचार मांडले आहेत. ज्ञान शिक्षणासह हक्क अधिकारापासून खितपत पडलेल्या वंचित बहुजन समाजाला, तळागाळातील जनतेला आणि स्त्रियांना जागे करण्याचे काम आणि विचारांचे अधिष्ठान देण्याचे कार्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

प्रस्थापित विचारांपेक्षा या महापुरुषांचे विचार क्रांतिकारक असून समाजातील प्रत्येक स्तराला व्यापणारे तसेच समाजाला मार्गदर्शन करणारे आणि उजेडात आणणारे हे विचार आहेत. या महापुरुषांचे साहित्य प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे, त्याचे नेहमी पारायण केले पाहिजे. त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्यास खऱ्या अर्थाने आपण या महापुरुषांचे अनुयायी ठरु. या प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असून सर्वांच्या सहभागातून त्याची फलश्रृती होईल, असा आशावाद आयुक्त पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रबोधन पर्वामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक मुख्य संयोजक संजय भोसले यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार संयोजक विजय कांबळे यांनी मानले.

तत्पूर्वी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़.  त्यानंतर पिंपरी येथील महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही आयुक्त पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना मानवंदनाही देण्यात आली.

प्रबोधन पर्वाच्या पहील्या दिवशी महापालिका कर्मचारीवृंदांकडून“भीमज्योती पहाट” कार्यक्रमाद्वारे महामानवांना संगीतमय अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी 8.30 वाजता स्थानिक कलाकारांचा गीतगायनांचा कार्यक्रम झाला. तदनंतर  सकाळी 10.30 वाजता शेखर गायकवाड यांच्या  गीत गायनाचा कार्यक्रम झाला.  तसेच दुपारी 12 वाजता सुनिल गायकवाड आणि सहका-यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम झाला. तसेच दुपारी 1.30 वाजता गीत गायन सादरकर्ते विनोद फुलमाळी यांचा कार्यक्रम झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.