Pimpri News: निगेटीव्ह रुग्णाला ठेवले कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ; वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार

कोरोनाची लागण झाल्यास कोण जबाबदार ? : नातेवाईकांचा सवाल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पिंपरीतील एका तरुणाची कोरोना अँटीजेन चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगत त्याला कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तीन दिवसांनी राज्य सरकारच्या संकतेस्थळावर रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे अपलोड केले. तसा मॅसेज नातेवाईकांना आला. पॉझिटीव्ह नसतानाही रुग्णाला पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ठेवले. त्यातून त्याला कोरोनाची लागण झाली तर जबाबदारी कोणाची ?, असा सवाल करत नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबतची हकीकत अशी की, पिंपरीतील एका 26 वर्षाच्या युवकाला 7 जुलै रोजी थोडा ताप आला होता. त्यामुळे जिजामाता रुग्णालयात 8 जुलैला त्याची कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार संबंधित युवक उपचारासाठी दाखल होण्याकरिता वायसीएम रुग्णालयात गेला. तेथून भोसरीतील बालनगरी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचे सांगितले. त्यानुसार युवक बालनगरीमध्ये कोविड सेंटरमध्ये दाखल झाला.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये राहून तीन दिवस उपचार घेतल्यानंतर 11 जुलै रोजी त्या युवकाचा रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा एसएमएस राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आला. त्यामुळे नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली. नेमका काय प्रकार आहे, याची त्यांनी खातरजमा केली असता राज्य सरकारच्या संकेतस्थळावर त्यांना निगेटीव्ह रिपोर्ट दिसला. निगेटीव्ह असतानाही रुग्णाला पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ठेवले. त्यातून त्याला कोरोनाची लागण झाली तर जबाबदारी कोणाची ?, असा सवाल करत संबंधितांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

याबाबत राजू वाघेरे म्हणाले, ”माझ्या पुतण्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे राज्य सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड झाले आहे. तसा मॅसेज आम्हाला आला. असे असताना त्याला कोरोना रुग्णांमध्ये तीन दिवस ठेवले. त्यामुळे तो पॉझिटीव्ह आला. लक्षणे वाढली. प्रकृती गंभीर झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?. प्रशासनात कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. भोंगळ कारभार सुरु आहे. अनेकांबाबत असे घडले असेल पण कोणी पुढे येत नाही. हे अतिशय संतापजनक आहे. असा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरुन पुन्हा दुस-या कोणाबाबतीत असे घडणार नाही”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.