Lonavala News: नाना पटोले यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने बेताल वक्तव्य करू नये : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आणि नेत्यांविषयी बोलण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. लोणावळा नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजपशी अभद्र युती करणाऱ्यांनी दुसऱ्यांविषयी बोलू नये, अशी जोरदार टीका मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केली.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथे पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील मित्र पक्ष व नेत्यांवर टीका केली. त्याला आमदार शेळके यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते, माजी खासदार आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल चुकीचे बोलणे त्यांना शोभत नाही, असे शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोणावळ्यात येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले, परंतु ज्या शहरात येऊन ते मार्गदर्शन करीत होते, ज्या ठिकाणाहून आपण संबोधित करत होता, तेथील नगरपरिषदेत काँग्रेस पक्ष भाजप सोबत राहून सत्तेचा उपभोग घेत आहे. ही सत्तेसाठीची अभद्र युती अख्ख्या लोणावळा व मावळ तालुक्याला ज्ञात आहे. आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून भाजपसोबत लागेबांधे असणाऱ्यांच्या बाजूला बसून निष्ठावंत कार्यकर्त्यांना धडे गिरवण्याचे काम करत आहात, या शब्दांत शेळके यांनी पटोले यांना सुनावले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी बोलण्यापूर्वी पटोले यांनी पुणे जिल्ह्यात, पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात अजितदादांनी काय-काय विकासकामे केली याची माहिती घेणे गरजेचे आहे, असे नमूद करून शेळके यांनी पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अजितदादांच्या विकासकामांचा आदर्श घेऊन पटोले यांनी त्यांच्या भागात असे विकासाचे मॉडेल राबवावे, अशी सूचनाही शेळके यांनी केली आहे.

पक्षात वजन वाढविण्यासाठी, पक्षवाढीसाठी पटोले प्रयत्न करत असतील परंतु त्यासाठी सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांवर, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरच टीका करणे, पूर्णपणे चुकीचे असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. महाविकास आघाडीच्या संबंधात दरी वाढविण्याचे काम नानांनी करू नये, असे आवाहन शेळके यांनी केले.

अशी बेताल वक्तव्ये करून पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांवर प्रभाव पाडून, समाजमाध्यमांत चर्चित राहून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याचा प्रयत्न आहे का, असा चिमटाही शेळके यांनी काढला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.