Pimpri News: महापालिकेकडून वृक्षगणनेला विलंब; ‘रयत’चे झाडावर बसून आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाकडून वृक्षगणनेला विलंब केला जात असल्याचा आरोप करत रयत विद्यार्थी परिषदेने अनोखे आंदोलन केले. नेहरुनगर येथील उद्यान विभागाच्या समोरील झाडावर बसून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.

वृक्षगणना आणि संवर्धन यासंदर्भात पालिकेच्या उद्यान विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला; परंतु सतत चालढकल केली जात आहे. उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी पत्राचे उत्तर देखील दिले नाही. परिषदेने 6 जुलै 2021 रोजी महापालिका भवनासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतरही उद्यान विभागाकडून वृक्षगणनेबाबत कोणतीच पाऊले उचलली नाहीत. याचा निषेध म्हणून आम्ही झाडावर बसून आंदोलन केले असल्याचे रयत विद्यार्थी परिषदेचे रविराज काळे यांनी सांगितले.

लवकरात लवकर वृक्षगणना करावी. संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. ठेकेदारास पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत आठ दिवसात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन उपायुक्त इंगळे यांनी आम्हाला दिले आहे. त्यानुसार आम्ही आंदोलन मागे घेतले आहे. आठ दिवसात निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.