Pimpri News: सिरो सर्व्हेसाठी महापालिका 10 हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील सुमारे 10 हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासण्यात येणार आहेत. पालिकेच्या 8 रुग्णालयांमधून प्रत्येकी 3 टीम तयार करण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असे 150 जणांची याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या टीमद्वारे पुढील दहा दिवस शहरातील 200 भागांमध्ये अ‍ॅण्टीबॉडी Antibody तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये झालेला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील दहा हजार नागरिकांच्या अ‍ॅण्टीबॉडी तपासणी करण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग शहरातील किती नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. याचा अंदाज घेण्यासाठी होईल. जेणेकरून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील उपचार करणे शक्य होईल.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असून ही समाधानकारक बाब असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य आणि प्रशासन विभागास त्याअनुषंगाने तयारी करण्यात येत आहे. सिरो सर्व्हेसाठी घरी येणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय पथकास रक्त नमुने घेण्याकामी शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.